अकोला/देगलूर--- शासन आणि समाजामधील सामाजिक समन्वयक म्हणून आपली लेखणी घेऊन तत्पर असणारे पत्रकार हे समृध्द लोकशाही आणि संविधानाला सुरक्षित ठेवणारे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.परंतू त्यांच्या समाज साधक कर्मपूजेची कोणतीही दखल न घेता उलट शासनासह विविध क्षेत्रातून त्याच्यावर अन्याय करणारांकडून त्यांचे आवाज दाबण्याचे व हक्कांपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
प्रशासनातील अनागोंदीविरूध्द लेखणी चालवून आक्रमकतेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर शासकीय कामात हस्तक्षेपाची शस्त्रे वापरली जातात.परंतू पत्रकारांवर हल्ले होतात त्यावेळी मात्र सारी कलमे संथ चालवून पत्रकार संरक्षण कायद्यालाही गुंडाळून ठेवले जाते.अनैतिक,भ्रष्टाचारीच पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करतात.या विषमतेच्या उन्मत्त प्रवाहाला प्रतिबंधित करण्यासाठी पत्रकारांनी आपसातील भेदभाव विसरून प्रबळ संघटीत शक्तीने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या लढ्याला बळकट करावे.असे आवाहन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी नांदेड जिल्हा पदग्रहण व सन्मान समारंभ तथा मार्गदर्शन मेळाव्यात बोलतांना केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नांदेड जिल्हयाचा मार्गदर्शन मेळावा देगलूर येथील स्वाद रेस्टॉरन्टमध्ये आयोजित करण्यात आला होता.येथील शैक्षणिक ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सेवाव्रती व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय एम.देशमुख हे विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संघटनेचे राष्ट्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख,(अकोला ) महाराष्ट्र राज्य संघटन व संपर्क प्रमुख भगिरथजी बद्दर,(परळी) वैभव ज्वाला चे संपादक देवानंद वाकळे,मार्गदर्शक विजयराव बाहकर,मनोहर मोहोड (अकोला) रामराव देशमुख (खामगांव) महेश पाटील,उपजिल्हाप्रमुख शिवसेना (ठाकरे),पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून पत्रकारांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त करीत लोक स्वातंत्र्य सभासद व ईतर पत्रकारांना सहकार्याचे अभिवचन दिले.
महाराष्ट्र राज्य संघटन व संपर्क प्रमुख भगिरथजी बद्दर यांचे मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागीय संघटन व संपक प्रमुख अॕड.नरसिंगजी सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सर्वप्रथम दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांना वंदन अभिवादन करण्यात आले. अतिथी सन्मानानंतर व पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हाध्यक्ष ईश्वर तलवारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरहरी गोरे,गंगाधर भुयारे,सुभाष शंकपाळे गंगाधर तमलूरकर,संतोष पवार व सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी लोकस्वातंत्र्याचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,नुरूद्दीन सिद्दीकी,शेख सरफराज,व नांदेड आणि मराठवाड्यातील बहूसंख्य पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.