कारंजा [ लाड ] ( दर्शन पाटील खंडार कडून )
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरीचे आजीवन प्रचारक, गुरुदेव प्रेमींचे आधारवड,ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. उद्धवराव गाडेकर महाराज यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले असून त्यांनी राहत्या गावी पाटसूल येथील आश्रमात शेवटचा श्वास घेतला.दि. ११मे रोजी सकाळी ९:२५वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या चार महिन्यापासून महाराज कॅन्सरच्या रोगाने ग्रासलेले होते.अकोला येथील डॉ.भागवत यांच्याकडे प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबई येथील टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्यानंतर अकोला येथे त्यांच्यावर उपचार चालु होते .आठ दिवसापूर्वी त्यांना अचानक ताप आला होता. परंतु नंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना १०मे रोजी संध्याकाळी ६:००वाजता आश्रमात आणण्यात आले. शेवटी महामृत्युंजय मंत्राचा जप चालु असतांना महाराजांनी शेवटचा श्वास घेतला.
तुकडोजी महाराजांच्या कार्याचा वसा घेतलेले त्यांचे वडील स्वर्गवासी महादेवराव गाडेकर यांच्या सुसंस्काराच्या तालमीत तयार झालेले डॉक्टर उद्धवराव गाडेकर महाराज यांच्याकडे वैद्यकीय पदवी असून सुद्धा त्यांनी डॉक्टरी पेशात न उतरता श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य तरुणपणातच हाती घेतले. तुकडोजी महाराजांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या महान उद्देशाने पेटून उठलेला हा झुंजार महामानव.सामुदायीक प्रार्थना, ध्यान, रामधून गावोगावी चालु करुन आजपर्यंत हजारो गावी कीर्तनाच्या रूपाने समाजाला मंत्रमुग्ध करून समाजाला दिशा देण्याचे अविरत कार्य आमरण चालू ठेवले.गेल्या ३०वर्षापासून आश्रमात सुसंस्कार शिबीर आरंभ करुन लाखो विद्यार्थी घडवले. कोरोनासारख्या महामारीत आपलं व्रत कायम ठेवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका गुरुकुंजात नेणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गाडेकर महाराज पाटसूल गावाचं वैभव आपल्यातून निघून गेल्याची खंत गुरुदेव प्रेमी, गावातील संत सज्जन मंडळी व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ज्या रोगाने ग्रासलं त्याच कॅन्सर सारख्या भयानक रोगाने महाराजांना वयाच्या अठ्ठावनव्व्या वर्षी ग्रासलं गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते ह्या आजाराशी लढा देत होते. "आपले दुःख न वदे कुणाला" हया तुकडोजी महाराजांच्या ओवीप्रमाणे त्यांनी सर्व त्रास सहन केला.परंतु जेव्हा असह्य वेदना वाढल्या डोक्याचा भयानक त्रास सुरू झाला तेव्हा दिनांक २५ जानेवारी २०२२रोजी स्वामी विवेकानंद जन्मोत्सव हिवरा आश्रम येथे त्यांनी शेवटचे किर्तन केले व दुसऱ्या दिवशी लगेच सर्व तपासण्या अकोला येथे केल्या असता कॅन्सरच्या रोगाचं निदान झालं आणि गेली तीन महिने आजाराशी लढा देत, सामुदायिक प्रार्थना न सोडता काल आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांच्यावर हजारो गुरुदेव प्रेमी भक्तमंडळी जनसमुदाय सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत दुपारी चार वाजून आठ मिनिटांनी अग्निसंस्कार करण्यात आला.
डॉक्टर उद्धवराव गाडेकर महाराजांना दोन पुत्र असून मोठा शिवदास व लहान शुकदास. गुरुदेव सेवा मंडळाचे पूर्ण कार्य शुकदास यांनी पूर्णत्वास न्यावे म्हणून स्वतःच्या संस्काराच्या तालमीत त्यांनी तयार केले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी दोन मुले तीन भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे गुरुदेव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो..
गाडेकर महाराजांच्या निधनाची बातमी कळताच अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी येवून महाराजांचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा फोन करून महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मॅसेज द्वारे श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीसाठी विधान परिषद सदस्य आमदार अमोल दादा मिटकरी, बुलढाणा माजी आमदार विजयराज शिंदे, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर, माजी आमदार गुलाबराव गावंडे, माजी आमदार दाळू गुरुजी, तसेच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, आजीवन प्रचारक लक्ष्मणदास काळे महाराज, हरिभाऊ वेरूळकर गुरुजी,अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी, संस्थेच्या उपाध्यक्षा पुष्पाताई बोंडे, स्वामी विवेकानंद आश्रम हिवरा अध्यक्ष मालपाणी सर, विजय पाटील खंडार, संजय कडोळे, संतोष केळकर, दर्शन खंडार यांनी महाराजांच्या कार्याला उजाळा देत साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ता मंडळी, दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार राउत साहेब व त्यांची चमू, सर्व धर्म पंथ संप्रदायाचे साधू संत सज्जन मंडळी हजारोंच्या संख्येत उपस्थित असून सर्वांनी गाडेकर महाराजांना अखेरचा निरोप दिला. कारंजा येथील गुरुदेव सेवा मंडळाचे विजय पाटील खंडार तथा संजय कडोळे यांनी ऑगष्ट मध्ये कारंजा येथे होऊ घातलेला वारकरी अधिवेशना करीता त्यांना आमंत्रीत केले होते . परंतु दुदैवाने तत्पूर्वीच त्यांची ज्योत मालवली . कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना, गुरुदेव सेवा मंडळ, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत श्रध्दांजली अर्पण केली आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....