वाशिम : वाशिम जिल्हा हा पूर्वी स्वातंत्र्यकाळापासून आजतागायत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु १९९० च्या दशकात महाराष्ट्रात शिवसेना पक्षाला, चांगले दिवस आले. आणि स्व. पुंडलिकराव गवळी यांच्या नेतृत्वाने वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा प्रवेश झाला. स्व. पुंडलिकराव गवळी यांच्या मृत्युनंतर त्यांचा वारसा त्यांच्या मुलीने भावनाताई गवळी यांनी पुढे गेल्या वीस पंचवीस वर्षात कायम चालविला. याचे यश भावनाताई यांच्या उत्तम राजयोगाला जाते. परंतु तरी देखील जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा फार मोठा जनसमुदाय या जिल्हयात असल्यामुळे रिसोड -मेडशी विधानसभा मतदार संघ कायमच काँग्रेसकडे राखण्यात झनक परिवाराला यश आले असून, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती सुद्धा आपल्याकडे राखण्यात यश प्राप्त झाले आहे. दिवगंत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे काँग्रेसच्या नावावर, येथे काश्मिर मधून आलेले गुलामनबी आझाद सारख्या अनोळखी व नवख्या काश्मिरी व्यक्तिला सुद्धा वाशिम जिल्ह्यातून संसदेत पाठवीले होते. हा या जिल्ह्याचा इतिहास आहे. कै.वसंतराव नाईक, स्व. सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने याच जिल्हयाने व वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाने दोन दोन काँग्रेसचे मुख्यमंत्री या राज्याला दिलेले आहेत. शिवाय बंजारा काशी असलेले पोहरा देवी या तिर्थक्षेत्रातून सुद्धा या जिल्ह्याच्या राजकारणाची सुत्रे चालविल्या जातात. बंजारा काशी पोहरादेवी हे संपूर्ण देशातील एकमेव असे धर्मापिठ असे आहे की, इथे नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक राजकिय नेत्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात. त्यामुळे अशा वाशिम जिल्ह्यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू आणि पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांचे सुपूत्र तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुलजी गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात येत असल्यामुळे, वाशिम जिल्हा परत एकदा तिरंग्याच्या रंगात रंगून काँग्रेसमय होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना साथ देण्याकरीता महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आणि विरोधी पक्षातील पण हदयातून काँग्रेसला मानणारी शक्ती खा राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून, खा. राहुल गांधी यांच्या आगमणाने जिल्ह्यातील काँग्रेसजनांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन उत्साह वाढणार आहे. आणि त्याचा लाभ लवकरच जिल्हयात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, मार्केट कमेटी निवडणूकीत काँग्रेसला होणार यात मुळीच दुमत नाही. खा. राहुल गांधी यांच्या आगमनाने जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघातील काँग्रेंसचे परत पुनर्जिवन होणार आहे. त्याकरीता कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ, रिसोड - मालेगाव विधानसभा मतदार संघ तथा वाशीम मंगरूळपिर विधानसभा मतदार संघातील युवा,ज्येष्ठ, काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक , महिला काँग्रेसने तयारी चालविली असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .