ब्रम्हपुरी तालुक्यातील तुमडी मेंढा व माहेर गाव शिवारातील परिसरात वाघाने घुमाकूळ माजविला आहे. दि. २१ सप्टेंबर २०२३ ला रात्रीच्या सुमारास तुमडी मेंढा गावातील नागरिक नारायण बुधाजी अमृतकर यांच्या गोठ्यातील बकरीवर वाघाने हल्ला करून ठार मारले. यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने सदर प्रकरणाची दखल घेऊन पिडीत इसमाला योग्य आर्थिक भरपाई देण्यात यावी.
सदर परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. माहेर व तुंमडी मेंढा गावातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घालून शेतीची कामे करावी लागत आहे, केव्हाही हल्ला होण्याची शक्यता नाकरता येत नाही, त्यामुळे वन विभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी उपवन संरक्षक वनविभाग कार्यालय ब्रह्मपुरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी माजी शहर प्रमुख शामराव भानारकर, उपतालुकाप्रमुख डॉक्टर रामेश्वर राखडे, शाखाप्रमुख गणेश बागडे, नारायण अमृतकर, देवेंद्र अमृतकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका उर्मिला अलोणे, तालुका संघटिका कुंदा कमाने, शहर संघटिका ललिता कांबळे, राखी बानाईत आदी शिवसैनिक उपस्थित होते.