वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): चालू वर्षाचे प्रारंभी ऐन हिवाळ्याचे उत्तरार्धात,पावसाचा कहर (वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिट) दि. 10 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार असल्याची भविष्यवाणी आमचे मित्र वाशिम जिल्ह्याचे लोकप्रिय हवामान अभ्यासक गोपालभाऊ गावंडे ( रुई गोस्ता ) यांनी डिसेंबर मध्ये केली होती.आणि त्यांच्या हवामान अंदाजानुसार दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी,यवतमाळ, धर्माबाद, अमरावती,धामणगाव रेल्वे, देवळी, वर्धा,गोंदियाचा काही भाग,चंद्रपूर, हिंगणघाट, भद्रावती,भोकर ,नांदेड , गोंदिया, भंडारा इत्यादी ठिकाणी गारपिटीचा पाऊस होऊन शेतकऱ्याची हाताशी आलेली कपाशी,गहू, हरभरा,भाजीपाला पिके, आंबा, संत्रा इत्यादीच्या फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. शिवाय दि. 11 फेब्रुवारी रोजी सुद्धा यवतमाळ ,धर्माबाद, माहूर, नांदेड भागात प्रचंड गारपिट झाल्याचे वृत्त असून,येत्या दि14 फेब्रुवारी नंतर देखील अवकाळीचे संकट पश्चिम व पूर्व विदर्भावर कायम रहाणार आहे. त्यानंतर दि 15 फेब्रुनंतर 21 फेब्रुवारी पर्यंत उघाड व परत 22 फेब्रुवारी रोजी अवकाळीचे संकट असल्याचा हवामान अभ्यासक गोपालभाऊ गावंडे यांचा अंदाज आहे.परंतु ह्या आस्मानी संकटाने विदर्भाचा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीन,कपाशी, तुर ह्या पिकांचे उत्पादन घटलेले आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चही भरून निघत नाही. त्यात मायबाप सरकार कडून शेतमालाला सोयाबीन कपाशीला भाव नाही तर दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या दाळ दाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्याप पर्यंत नुकसान भरपाई आणि पिकविम्याची रक्कमही वळती करण्यात आलेली नाही.त्यामुळे विदर्भाच्या शेतकरी राजामध्ये तिव्र असंतोष निर्माण होत असल्याचे वास्तव आहे. तरी आतातरी सरकार शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल काय ? आणि शेतमालाला भाव देणार काय ? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी राजाकडून चर्चीला जात असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.