आज जर मराठमोळ्या संस्कृतीचे आणि अस्सल वारकरी संप्रदायाचे दर्शन घडत असेल तर ते म्हणजे महाराष्ट्राच्या लहानमोठ्या गावखेड्यातच.ग्रामिण भागातील रहिवाशांमध्ये,प्रामाणिकता व मनमिळाऊ स्वभाव.परक्यांशीही दया,क्षमा,शांती व नितीमत्तेनी वागण्याची माणूसकी.आणि आपल्या देश,धर्म,संस्कृती विषयी स्वाभिमान अगदी ठासून भरलेला असतो.शिवाय महाराष्ट्राला लाभलेल्या संतपरंपरेचे अनुपालन केवळ ग्रामिण भागातूनच होत असते.त्यामुळे पृथ्वीच्या पाठीवर असलेला आपला भारत महाराष्ट्राच्या संत भूमी-वारकरी भूमी असलेल्या गावखेड्यातच वसलेला आहे.असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.व अशा देश आणि धर्माला टिकविण्याचं महान कार्य केवळ सुदाम्या सारख्यांच्या दारिद्रयावस्थेतील वारकरीच करू शकतो.हे त्रिकालाबाधी सत्य आहे. संपूर्ण आयुष्यभर भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या,हभप राजारामजी काटे यांचा जन्म हा , शेतकरी कुटुंबांतील भिलाजी काटे आणि मथुराबाई भिलाजी काटे यांच्या कुटूंबात,दि.12 सप्टेंबर 1947 रोजी,बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील पन्हई ह्या छोट्याशा खेडयामध्ये झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच,आई वडील वारकरी संप्रदायाचे असल्या कारणाने त्यांच्यावर,श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीचे संस्कार झाले.त्यामुळे बालपणापासूनच राजारामजी यांना हरी भक्ती ची ओढ लागून, गावातील श्री.हनुमान मंदिरातील,सकाळचा काकडा, सायंकाळचा हरिपाठ, भजन,किर्तन,प्रवचनाचा व्यासंग त्यांना जडला.शेतकरी कुटूंबात जन्माला आल्याने शेती हेच या अल्पभूधारक कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन होते.पुढे त्यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातिल नांदुरा तालुक्यात येणाऱ्या ग्राम बोरजवळा येथील निनाजी माधवजी वसतकर आणि द्वारकाबाई निनाजी वसतकार या दाम्पत्याच्या मुलीशी सुमनबाई यांचे सोबत पार पडला.अल्पशा शेतीमध्ये राबत असतांनाच त्यांनी 50 वर्षापूर्वी मोताळा येथे "संतकृपा जनरल स्टोअर्स" या नावाने छोटेसे दुकान सुरु केले होते.(जे सद्य परिस्थितीतही संतकृपेने सुरुच असून त्यांचा लहान मुलगा सोपान चालवीत आहे.) याच काळात आईवडिलांच्या संस्काराने लहानपणा पासून हरिभक्ती मध्ये रममाण असलेले राजारामजी भजन आणि किर्तनामध्ये मृदंग वाजवून किर्तनकाराला साथसंगत देऊ लागले होते.व त्यामुळे पुढे पुढे तर ते मृदंगाचार्य म्हणून सुप्रसिद्ध होऊन,गावोगावी खेडोपाडी त्यांची मृदंगाचार्य म्हणून किर्ती पसरवून त्यांना किर्तनकाराच्या साथसंगती करीता बोलविले जावू लागले. अशाप्रकारे संसाराचे राहाटगाडे चालवीत असतांना,राजारामजी काटे आणि सुमनबाई यांच्या संसारवेलीवर दोन मुले गजानन आणि सोपान तसेच एक मुलगी मुक्ताबाई जन्माला आली. मोठ्या मुलाने शिक्षणानंतर पत्रकारीता ही निष्काम समाजसेवा निवडली तर लहान मुलगा वडीलांच्या व्यवसायात रममाण असून,संतकृपा जनरल स्टोअर्स चालवीतो.तिनही मुलांचे विवाह झाले असून मुलगी नांदूरा येथे राहते.तर मोठा मुलगा अकोला आणि लहान मुलगा वडिलांचा व्यवसाय चालवीतो.अशाप्रकारे मुलामुलीचा संसार सुरू असल्याने पुढील आयुष्य केवळ आणि केवळ संतसंगतीत घालविण्याचे ठरवून हरिभक्त राजारामजी यांनी दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपूर येथील वारीची परंपरा देखील जपलेली होती.त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वारकरी संप्रदाया करीता शासनस्तरावर एखादे वारकरी विद्यापिठ सुरु करावे अशी त्यांची मागणी असून,मनोमन इच्छाही आहे. अशाप्रकारे विठुरायाच्या भक्तीमध्ये स्वच्छंदी आयुष्य वेचत असतांना दुदैवाने काही वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.आयुष्याच्या अखेरच्या टप्यावर वारकरी संप्रदायाकरीता विद्यापिठ निर्मिती करीता धडपड करणाऱ्या,राजारामजी यांच्या शरिराची उजवी बाजू असंवेदनशिल किंवा निकामी होऊन बसली.मुलांनी अनेक डॉक्टरांकडे व वैद्याकडे उपचाराचा प्रयत्न केला.परंतु दुदैवाने आपल्या देशात आजही अर्धांगवायूची 100 % निरोगी करणारी उपचार पद्धतीच अंमलात आलेली नाही.असेच याप्रसंगी म्हणावे लागेल. व त्यामुळे त्यांना आज वृद्धापकाळी आहे त्या परिस्थिती मध्ये जीवन व्यतीत करावे लागत आहे.असो, गावातील समवयस्क मित्रमंडळासह राजारामजी हे गावातीलच नातवंड पतवंडामध्ये सुप्रसिद्ध असल्याने त्यांचे स्नेहीजन मोठ्या उत्साहाने ह्या हरिभक्त सुदामा ठरलेल्या,हभप राजारामजी भिलाजी काटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत असतात. त्यानिमित्त वारकरी संप्रदायाच्या हभप राजारामजी यांना दंडवत करण्याच्या हेतूने माझा हा लेख मी लिहीला आहे.हभप राजारामजी यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा !
*लेखक : संजय म. कडोळे, (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त.) अध्यक्ष : विदर्भ लोककलावंत संघटना, कारंजा (लाड) जि. वाशिम.मो.9075635338*