चंद्रपूर : शहरातील दाताळा मार्गावरील जगन्नाथ बाबा मठाजवळील देशी दारु दुकान हटविण्यासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिक एकवटले असून दुकान हटविण्यासाठी आगळेवगळे आंदोलन करुन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधत आहे. दरम्यान आज शनिवारी (23 एप्रिल) ला दुकान हटविण्याच्या मागणीसाठी पाचहजार पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्धार करून पत्र पाठविण्याल सुरुवात केली आहे.
दाताळा मार्गावरील जगन्नाथ बाबा मठ परिसरात नव्याने दारु दुकानाला परवानगी देण्यात आली. मात्र या दुकानाला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी जनविकास सेनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनामुळे दुकान बंद करण्यात आले. दुकानाचे स्थलांतरण करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी दुकानासमोरच सत्याग्रह आंदोलन सुरु केले. आंदोलनात महिलांनी सहभागी होत भजन आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. आज शनिवारपासून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दुकानाचे स्थलांतरण करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना सुमारे पाचहजार पत्र पाठविण्यात येणार आहेत. पत्र पाठविण्यास महिलांनी सुरूवात केली आहे.
जगन्नाथबाबा नगर परिसरातील प्रत्येक घरी जाऊन महिला जनजागृती करीत आहेत. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून दारू दुकान विरोधात पत्रावर स्वाक्षरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार पत्रे पाठवून मागणी लावून धरण्यात येणार आहे. आज शनिवार साव ले-आऊट जगन्नाथबाबा नगर येथून आगळ्यावेगळ्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. जनविकास महिला आघाडीच्या रूपा बैरम, मेघा दखणे, रेखा पोलावार, शकुंतला रामटेके, राखी रामटेके प्रणाली बैरम, उत्कर्षा साव, अरुणा महातळे, मेघा मगरे, रमा देशमुख,रंजना कांबळे, पल्लवी दानी शांताबाई पेटकर यांची उपस्थिती होती.