कारंजाः सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव (देव) पर्यंतची माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा रविवार दि.०५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.दि.०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:०० वाजता शहरातील पहाडपुरा (टिळक चौक) कारंजा येथून पालखी पदयात्रेचे प्रस्थान होईल.आणि धामणगाव देव पोहचून, मुंगसाजी माऊलीचे दर्शन घेऊन सायंकाळी कारंजा शहरात परत येईल. त्यानंतर सोमवार दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ : ०० ते ४ : ०० या वेळेत वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन पहाडपुरा येथे करण्यात आले आहे. पालखीमध्ये चहा पाणी नाश्ता व भोजनाची करण्यात येणार असून भाविकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री माऊली पालखी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या पालखी पदयात्रेमुळे भाविकांना अध्यात्माच्या आनंदाचे दर्शन घडणार आहे. १५ ते २० वर्षापूर्वी माऊलीचे सद्भक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले, सुनिल गुंठेवार, भगवानदास खेमवाणी,हभप संजय महाराज कडोळे,सुनिल माकृवार, योगेश गढवाले, रुपेश गढवाले,राम गटागट,राजाभाऊ शेळके,अरविंद गुंठेवार,विजय खंडार व इतरांनी एकत्र येत माऊली सेवा समिती स्थापन करून, श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देव पर्यंत,पालखी पदयात्रा सुरु केली होती.पहिल्या वर्षी केवळ १७ वारकऱ्यांना सोबत घेऊन निघालेल्या पालखी पद यात्रेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आता मात्र दरवर्षी पालखी पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कारंजा येथील पहाडपुरा येथून माऊली सेवा समितीची पालखी पदयात्रा रविवार ०५ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी ०८ : ०० वाजता धामणगाव (देव) करीता पायदळ निघणार असून संत नामदेव महाराज मंदिर,अमोल गढवाले यांचे निवास कुंभारपूरा मार्गे दारव्हा वेशीमधून गावाबाहेर पडून,धामणगाव देव करीता रवाना होईल.मार्गात सोमठाणा, सांगवी रेल्वे,श्रीसिद्ध रामनाथ महाराज मठ संस्थान,रामगाव रामेश्वर हून बोदेगाव येथे जाईल त्यानंतर श्री मुंगसाजी महाराज संस्थान धामणगाव देव येथे दर्शन व आरती नंतर पदयात्रेचा समारोप करून पालखी पदयात्रा कारंजा येथे परत येईल. तर दि. ६ जानेवारी २०२५ रोजी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या पालखी पदयात्रेत भजनी मंडळे व भजनी दिंड्या घेऊन वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री माऊली पालखी सेवा समितीच्या वतीने गढवाले परिवाराकडून करण्यात आल्याचे वारकरी मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख संजय महाराज कडोळे यांनी कळविले आहे.