कारंजा : अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारत आणि हिंदु धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचा उत्सव सतीयुगाचे काळापासूनच युगानुयुगे
घरा घरात साजरा केल्या जात असतो. ३३ कोटी देवादिकांनी बाल गणेशाला प्रथम पूजनाचा मान दिला असल्याने प्रत्येक स्त्री-पुरुष,आबालवृद्ध गणपती उत्सव साजरा करीत असतात. स्वातंत्र्य प्राप्ती करीता 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मिळावीणारच.' अशी गर्जना देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा, समाजातील नागरीकांना एकोप्याने एकजुट करता यावे. त्यामधून समाजाचे प्रबोधन करता येवून मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार होईल. या उद्देशातून
श्री. गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्याचा पायंडा पाडला. आज भारत स्वतंत्र झाला.मात्र तेव्हापासून केवळ राज्यातच नव्हे तर सकल विश्वभरात बाप्पाचा सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.आपल्या राज्यात तर श्रीगणेशोत्सवाला शासनाच्या सांस्कृतीक विभागाची मान्यता असून राजाश्रय आहे. श्री गणेशोत्सवाचे लहान मुलांना व तरुणाईला विशेष असे आकर्षण असते.त्यामुळे प्रत्येक शहर, वस्त्या,गावखेडे,वार्डावार्डा मधून विविध संस्था,मंडळ,संस्थान, शासकीय निमशासकिय अधिकारी,कर्मचारी यांच्या निवासस्थानी श्रीगणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. पोळ्याची अमावस्या होताच श्री गणेशाच्या आगमनाची चाहूल लागते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.हिंदू धर्मात या उत्सवाला महत्त्व आहे.हा उत्सव आता बुधवार दि.२७ ऑगष्ट २०२५ रोजी सुरू होणार असून, हिंदू धर्मीय पंचांगाप्रमाणे गणेश चतुर्थीची तिथी दि.२६ ऑगस्ट रोजी दुपारी ०१ :५४ वाजता सुरू झाली असून दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ०३: ४४ वाजता चतुर्थी तिथी समाप्त होईल. त्यामुळे श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेकरीता शुभ मुहूर्त पाहिले असता,पूजेसाठी दि. २७ ऑगष्ट रोजी सकाळी ११: ०५ ते दुपारी ०१ : ४० च्या दरम्यानचे मुहूर्त श्रीगणेश प्राणप्रतिष्ठेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे.त्यामुळे या शुभ मुहूर्तावर श्री.गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करण्यात यावी. योग्य मुहूर्तावर स्थापना करून पूजा केल्यास घरात सुख,शांतता आणि समृद्धी येते.त्यामुळे सर्व गणेश भक्तांनी या शुभ मुहूर्तावरच बाप्पाची स्थापना करावी.त्याकरीता श्री गणेशाची मूर्ती मिरवणूकीने वाजत गाजत आणणाऱ्या मंडळांनी सकाळीच जाऊन दुपारपूर्वी प्राणप्रतिष्ठा स्थळावर किंवा मंडपात आणावी.शिवाय वैज्ञानिक दृष्ट्या दि.२७ ऑगष्ट रोजी मुसळधार पावसाचे सुद्धा पर्जन्ययोग आहेत.करीता सर्व सार्वजनिक श्रीगणेश मंडळांनी दुपारपूर्वी श्री गणेशाची स्थापना करावी.असे आवाहन संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभाग कारंजाचे,कारंजा तालुका प्रमुख तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी श्रीगणेश भक्तांना केले आहे.