अकोला:- स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम संपूर्ण भारतभर राबविले जात आहेत.मागील वर्षी प्रमाणे ह्या वर्षीही दिवाळी निमित्त दिव्यांग बांधवांनी दिवाळी किट व पूजन साहित्याची निर्मिती केली आहे.या दिवाळी किटला भारताबरोबरच अमेरिका,दुबई सारख्या ठिकाणांहून मोठी मागणी मिळत आहे.चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देऊन भरभरून कौतुक केले आहे.दिवाळी पूजन किट मध्ये दिव्यांगांनी तयार केलेले ५ पणत्या,५ बोळके,वाती, उदबत्ती, धूप,सुगंधी उटणे,लाह्या व बत्तासे इत्यादी साहित्य पर्यावरणपूरक पद्धतीत उपलब्ध केले आहे.
ह्याच बरोबर तुपाच्या फुलवाती, विविध रंगातील मातीचे मेणाचे बोळके, पणत्या , तुळशी वृंदावन, अभ्यंगस्नान, अत्तर, मेणाचे दिवे व विविध शोभिवंत वस्तू दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या विविध वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.सदर दिवाळी किट व पूजन साहित्याच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग रोजगारासाठी समर्पित आहे.एक हात सहकार्याचा या सामाजिक उपक्रमातून अंध, मुकबधीर व अस्थिव्यंग अशा १०० व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे.हे सर्व दिवाळी साहित्य मागविण्यासाठी व ज्या दिव्यांगांना या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संस्थेच्या ०९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या सदस्य अनामिका देशपांडे,डॉ.संजय तिडके, डॉ.छाया देशमुख, सारिका उगले, दुर्गा दुगाने, श्रद्धा जोध, राजू डांगे, अस्मिता मिश्रा, नयना लवंगे,जिया खेतान व सुजाता आसोलकर यांनी केले आहे. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या या सामाजिक उपक्रमाला शाळा, महाविद्यालय, देशमुख महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, अखिल भारतीय मारवाडी महिला मंच, सिंधी समाज, खंडेलवाल महिला मंडळ, विश्व मांगल्य सभा, रोटरी क्लब, लायनेस क्लब, योग साधक, ज्येष्ठ नागरिक संघ व विविध सामाजिक संस्थांनी दिवाळी किट बुक करून दर्शविला आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....