अकोला, ता. 10 : डिजिटल साधनांचा वेगाने वाढणारा वापर जितका उपयुक्त आहे तितकेच त्यातील धोकेही गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. ऑनलाइन खरेदी मोबाईल बँकिंग सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग यामध्ये जपावयाची काळजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला आणि क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने भाऊसाहेब तिरूख विद्यालय, खिरपुरी येथे सायबर सुरक्षा विषयी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतःच्या सादरीकरणातून अनेक महत्त्वाचे मुद्दे जसे की फ्रॉड वेबसाईट कशा ओळखाव्या, फिशिंग, ऑनलाइन गेम्स व फ्री गिफ्टच्या आमिशातून होणारी फसवणूक, तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी वापरायचे उपाय याबद्दल त्यांनी स्पष्टपणे मार्गदर्शन केले. या शिबिराचे मार्गदर्शन कु. चंचल निंबाळकर आणि कु. ईश्वरी मोकळकर यांनी केले. खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू आणि सायबर शिक्षण समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. कल्पना धोत्रे मॅडम व इतर शिक्षक वर्ग हजर होता. मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक केले.