वाशिम - येथील शेतकरी वैभव बंडु माळेकर, रवि माळेकर आणि विमलबाई माळेकर यांच्या मालकीच्या घोडबाभुळ येथील गट नं. २७ (१) मध्ये असलेल्या अडीच एकर शेतातील सोंगुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला रविवार, १५ ऑक्टोंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने या आगीत शेतकर्याचे अंदाजे २५ पोत्याचे सोयाबीन जळुन खाक झाले. या आगीत शेतकर्याचे जवळपास सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. रवि माळेकर यांनी सोमवारी, १६ ऑक्टोंबरला घटनेची फिर्याद शहर पोलीस स्टेशन दिल्यानंतर दुपारी १२ वाजता पोलीसांनी तलाठी पटुकले यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन फिर्याद दाखल केली आहे. मोठ्या परिश्रमाने उगवलेले सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला असून यामुळे शेतकरी माळेकर परिवार चिंतातुर झाला आहे. या घटनेची चौकशी करुन आरोंपींना अटक करण्यासह शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी माळेकर यांनी केली आहे.