चंद्रपूर, : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सन 2025-26 करिता जिल्ह्याला गोदाम बांधकामासाठी 1 लक्षांक मंजूर करण्यात आलेला असून, गळीत धान्य पिके घेतली जात असताना गोदामाची सुविधा उपलब्ध नसलेल्या भागांमध्ये हे गोदाम बांधकाम करण्यावर भर देण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत 250 मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 12.50 लाख रुपये इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यातील जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाईल.
सदर योजना बँक कर्जाशी निगडीत असून, याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनी (FPO/FPC) यांनी केंद्र शासनाच्या SMART किंवा वखार महामंडळ यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित प्रकल्प बँकेसमोर सादर करावा. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतरच ही संस्था अनुदानासाठी पात्र राहील.
तालुका कृषी अधिकारी यांनी अशा पात्र इच्छुक अर्जदार संस्थांचे अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पूर्वसंमतीसाठी दिनांक 15 जुलै 2025 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.