उत्तर ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील सायगाटा भागात वाघाच्या हल्ल्यात गुराखीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ४.३० वाजता घडली. सुनील ऊर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत (वय ३२, रा. लाखापूर) असे मृताचे नाव आहे.
सुनील राऊत हे नेहमीप्रमाणे लाखापूरच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेला होता. गुरे चारून परत येताना झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुनील राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाकडे सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत एकूण ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये २८ जण वाघाच्या, १ जण हत्तीच्या तर १ जण अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली आहे. लाखापूर परिसराला लागून सुमारे ६०० एकर जंगल असून त्यात ११ वाघ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.