वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : मंगरुळपीर येथील जुन्या पंचायत समितीच्या सभागृहात २३ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबीर उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेखा भगत यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम., उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, प्रभारी तहसीलदार रवी राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी नितिन लुंगे व पंचायत समिती सदस्यांची उपस्थिती होती.
या शिबिरात महसूल, महिला व बालकल्याण, बांधकाम, पंचायत, पाणी पुरवठा, आरोग्य, कृषी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या महिलांविषयक योजनेची माहिती देणारे स्टॉल्स लावले होते. शिबिराला तालुक्यातील महिलांनी मोठया संख्येने भेट दिली. यावेळी महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली.
शिबिरात ५१ महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यापैकी महसूल विभागाशी संबधित- ९, पंचायत विभाग संबधित- २४, घरकुल विभाग संबधित- १४, आरोग्य विभागाशी संबधित- ३ आणि वीज वितरण कंपनीशी संबधित एक समस्या होती. या समस्या संबधित विभागास कार्यवाहीसाठी देण्यात आल्या. महिलांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी नितिन लुंगे, त्यांच्या कार्यालयातील पर्यवेक्षक, मुख्य सेविका तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.