शिक्षणाची जिद्द आणि मनाचा आत्मविश्वास जेव्हा दृढ निश्चयाच्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा वाटेने आलेल्या खडतर प्रवासावर देखील मात केली जाते.याचा आदर्श
सामान्य परिस्थितीत जीवन जगणाऱ्या दहिगावची कन्या असलेल्या दुर्गाने औषध निर्माण अधिकारी पदावर आरूढ झाल्याने इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील रहिवाशी श्रीकृष्ण डांगे व अन्नपूर्णा डांगे हे शेतकरी कुटुंब सामान्य आर्थिक परिस्थितीत अल्पशा शेतजमीनीच्या आधारावर आपल्या चार अपत्यांना सांभाळतात.मोठी मुलगी दुर्गाला लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीची देणगी लाभल्याने अभ्यासात प्रगती पथावर होती.प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेत असतानाच चौथी आणि सातवीच्या दोन्ही स्कॉलरशिप परीक्षेत मेरिटमध्ये येण्याचा बहुमान पटकावला.आठविमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय दहिगाव अवताडे या हायस्कुल मध्ये प्रवेश घेऊन आठवीच्या नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा व नववीत असतांना नॅशनल मेरिट कम मिन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले.दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन 12 वि विज्ञान शाखेतून पूर्ण करून औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.मुक्त विद्यापीठातुन इतिहास व मराठी साहित्य पदवी पूर्ण करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.स्पर्धा परीक्षेकरीता पुणे येथील रयत प्रबोधिनी मध्ये अभ्यासाचे धडे घेतले आणि येथूनच आयुष्यातील परमोच्च शिखर गाठण्याचा भाग्योदय झाला.डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीमधून मार्च 2024 मध्ये औषधं निर्माण अधिकारी म्हणून जिल्हा परिषद नंदुरबार येथे नियुक्ती झाली.19 ऑगस्ट रोजी आपला पदभार स्वीकारून स्वतःला जनसेवेत समर्पित केले.
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात जशी आईवडिलांची साथ होती तशीच लग्न झाल्यावर सासरे-सासू--पती यांचे आशीर्वाद व सहकार्याने मी माझ्या लक्षापर्यंत पोहोचल्याची प्रतिक्रिया दुर्गाने व्यक्त केली.