वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्हयात 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होवून नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. स्थापन झालेल्या नवदुर्गाचे विसर्जन दि.25 ते 27 ऑक्टोबर 2023 दरम्यान सार्वजनिकरित्या मिरवणूका काढून करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या काळात नवदुर्गा मंडळाकडून मिरवणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनावर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळे, त्रिशुल, कट्यार असे प्रत्येक वाहनावर घातक व मारक शस्त्र लाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची पार्श्वभूमी आहे. जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असून सार्वजनिक सण उत्सव काळात व इतर कारणावरुन जातीय दंगली घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पुर्व इतिहास आहे. जातीय दंगलीचे व नवदुर्गा उत्सव काळात दाखल गुन्हयांच्या आकडेवारीनुसार जिल्हा सण,उत्सवाच्यादृष्टीने व जातीयदृष्टया संवेदनशील असल्याचे स्पष्ट होते. स्थापन झालेल्या नवदुर्गाच्या विसर्जनादरम्यान एखादा अनुचित प्रकार घडून जातीय दंगल घडून आल्यास, नवदुर्गा विसर्जनादरम्यान शक्ती प्रदर्शनाकरीता वाहनांवर लावण्यात आलेल्या घातक शस्त्रांचा वापर एकमेकांविरुध्द मारक शस्त्र म्हणून होवू शकतो. त्यामुळे जीवित हानी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता नवदुर्गा विसर्जनादरम्यान वाहनावर शक्ती प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने लावण्यात येणाऱ्या तलवार, त्रिशुल, भाला, कोयता, विळा, दांडपट्टा, कटयार आदी धारदार घातक शस्त्रांवर बंदी घालण्यात येत आहे. नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काळात दि.25 ते 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत संपूर्ण जिल्हयात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द पोलीस विभागाकडून फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे या आदेशात नमुद केले आहे.