कारंजा : सध्या चैत्राच्या रखरखत्या उन्हाने प्राणीमात्रांच्या अंगाची लाही भाजली जात असून,एसी कुलरही उन्हाच्या दाहकतेमुळे निष्क्रीय ठरत असल्याचे वास्तव आहे. दिवसेंदिवस दररोज उन्हाचा पारा वाढतच जात असून,तापमानाची सरासरी 42 ते 44 अंश सेल्सियसच्या वर आणि 45 अंश सेल्सियसच्या दरम्यान स्थिरावलेली आहे.त्यामुळे दिवसा ढवळ्या संचार करणेही कठीण होऊन बसले आहे.या उष्णतेचा मनुष्याच्या आरोग्यावर अतिशय प्रतिकुल परिणाम होऊन उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे डोकेदुखी,कंबर,हातपायाची सांधी दुखने,ताप,डायरीया अशा आजारात वाढ होऊन,जवळच्या रुग्नालयात आजारी रुग्नांच्या गर्दीत वाढ होत आहे.अतिशय उष्णतेमुळे जेवणाऐवजी पाणी पाणी करून जीव कासावीस होत असून जीवाला पाण्याची तहान लागत आहे.मात्र अशा उष्णतेच्या घाईगर्दीत एकीकडे लग्नसराईची धामधूमही जोरात असून,भर उन्हाळ्यातील लग्नसराईमुळे वऱ्हाडी मंडळीची मात्र चांगलीच पंचाईत होऊन गेली आहे. नाती गोती सोयरपण सांभाळण्यासाठी इच्छा नसतांनाही त्यांना लग्नसंमारंभास हजेरी लावावी लागत आहे. त्यामुळे बाजार पेठेत आणि लग्नमंडपात वर्दळ अनुभवास मिळत आहे.मात्र जेवणाऐवजी त्यांची थंडगार पाणी,शितपेये, लिंबूशरबत, लस्सी उसाच्या रसाची मागणी वाढत आहे. ह्या उष्णतेचे सर्वाधिक दुष्परिणाम गरोदर स्त्रीया,नवजात बालके, आजारग्रस्त व्यक्ती,दिव्यांग आणि वयोवृद्धावर सर्वाधिक होत आहेत.अद्याप वैशाख महिना बाकी आहे.पुढील आठवड्यात उष्णतेचा पारा आणखी जास्त वाढण्याची दाट आहे.एखादेवेळी अचानक उष्णतेचा पारा 45 अंश सेल्सियसचे वर पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नसून 50 अंश सेल्सियसच्या जवळ उन्हाचा पारा पोहोचल्यास सृष्टितील पशूपक्षी आणि जीवजंतू सोबतच मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारताच येत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या, समाजातील शेजार पाजारच्या लोकांचीही काळजी घेणे जरूरी आहे.आज उन्हाची प्रचंड आग पाखड होत असतांना गावोगावी मात्र शेतातील शेतमजूर,इमारत बांधकामावरचे-रस्तेमार्गावरचे मिस्त्री,मजूर,हमाल,कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात राब राब राबत आहेत.रोजच्या रोजंदारी वर उदरनिर्वाह असणारी ही गरजवंत मंडळी ऊन असो वा पाऊस ; थंडी असो वा वारा ह्या कशाचीही पर्वा न करता राब राब राबत असतात. यंदाचा उन्हाळा अतिशय जास्त आहे. अक्षरशः जीवघेणा आहे. थेट आरोग्यावर परिणाम करणारा आहे. त्यामुळे मात्र अशा कामगार मजूरांची काळजी संबधीत बिल्डर्स,घरमालक, कारखानदार यांनी घेऊन त्यांच्या करीता शक्य असेल तेथे सावलीची व्यवस्था, थंडगार पिण्याच्या पाण्याची, ताक, लिंबू शरबत,ओ आर एस वा मिठ साखर पाण्याची तरी व्यवस्था केली पाहिजे.त्यांना दर अर्ध्या पाऊण तासाला दहा पंधरा मिनिटांचा विश्राम दिला पाहिजे. तसेच शेत मजूर,बांधकाम कामगार ,मजूर यांनी उपवाशी पोटी काम करू नये. शक्यतोवर सकाळ पाळी व रात्रपाळीत कामे करावीत . दुपारी १२ : ०० ते ०५ :०० विश्रांती घ्यावी.पाण्याची बॉटल,आरोग्यदायी कांदा, भिमसेनी कापूर जवळ ठेवून मध्यंतरी त्याचा वास घ्यावा. उन्हातान्हात कामे करतांना पांढरे सुती सैल कपडे घालावे. डोक्याला उपरणे किंवा टोप घालावा. शक्य असेल तेथे डोळ्या करीता गॉगलचा वापर करावा. चालू आठवड्यात उष्णतेचा प्रकोप जास्तच वाढणार आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात येत असून, शक्यतोवर सर्वांनी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० पर्यंत उन्हातान्हात घराबाहेर न पडता सुरक्षीत ठिकाणी थांबावे.आपल्या परिसरातील आसपासच्या दिव्यांग,निराधार, वयोवृद्ध,आजारग्रस्त, गरोदर महिला व लहान मुलांची काळजी घ्यावी.असे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सेवाव्रती दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.