वाशिम : राज्याच्या वनविभागाने वन्य प्राण्यासाठी जंगले राखून ठेवलेली असली तरी ह्या जंगलांना तारेचे कुंपन किंवा सुरक्षेकरीता भिंती नसल्यामुळे वन्य प्राणी स्वैर संचार करीत असतात.सद्यस्थितीत कारंजा वन्य परिक्षेत्रात रोही,निलगायी, हरिण,काळवीट यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून हे वन्यप्राणी पाणी चारा इ खाद्याच्या शोधात भटकत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याच्या तक्रारी व शेतकऱ्यांची कुरबूर नेहमी सुरु असते. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी सातत्याने होत असतांनाही शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष्यच केल्या जात आहे.तालुक्यात वन्यप्राण्यांसाठी,सोहोळ काळवीट अभयारण्य असले तरी विकास निधीअभावी या अभयारण्याचा विकास पूर्णतः रखडलेला आहे.सदहू अभयारण्य पर्यटनासाठी खुले करण्यात येवून ग्रामिण बेरोजगार ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी आम्ही शासनाकडे वारंवार करीत आहो. परंतु लोकप्रतिनिधींच्या सपशेल दुर्लक्ष्यामुळे या अभयारण्याचा विकास रखडला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी म्हटले आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले की,कारंजा शहराच्या आजूबाजूला असलेले सर्वच मार्ग व रस्ते काही प्रमाणात वन विभागाच्या राखीव जंगलातून निघालेले आहेत.त्यामुळे बरेच वेळा वन्यप्राण्यामुळे वाहनांचे लहानमोठे अपघात होत असतात.शिवाय अनेक वेळा हे रानटी प्राणी शेतकरी व प्रवाशांवर हल्लेही करीत असतात.त्यामुळे त्यांच्या भितीमुळे महिला शेतमजूर आणि शेतकरी देखील शेतात जायला घाबरत असतात. स्वतःच्या शेतात जाण्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. आधीच जगाचा पोशींदा असणाऱ्या शेतकऱ्याला, शेती पिकविण्यासाठी सावकारी कर्ज काढून आस्मानी व सुलतानी संकटाचा मुकाबला करावा लागतो.त्यातच भरीस भर म्हणून की काय ? वन्यप्राण्यांनी त्यांना बेजार करून सोडलं आहे. शेतातील शेतमालाची नासाडी करण्या सोबतच आता तर वन्यप्राण्याकंडून शेतकरी, शेतमजूरांवर हल्ले होऊन त्यांना प्राणास मुकावे लागत आहे. काही वर्षापूर्वी दिघी येथील राखणीला गेलेले शेतमजूर स्व. सुदाम लोखंडे रोह्याच्या हल्ल्यात ठार झाले होते तर नुकतेच दि ०७ मे २०२५ रोजी काकडशिवनी येथील शेतकरी स्व.राजू आत्माराम लळे हे रोह्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले व उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे असल्या गंभीर प्रकाराची वनविभागाने दखल घेऊन १) वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. २) वनविभागाच्या राखीव जंगलांना तारेचे कुंपन किंवा सुरक्षा भिंतीचे बांधकाम करावे. ३) शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचे सुरक्षा रक्षक नेमावेत. ४) जंगली श्वापदांच्या हल्ल्यापासून नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचा विमा उतरवावा. ५) वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी किंवा मृतक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाईची आर्थिक मदत मिळावी. ६) प्राण्याच्या बंदोबस्तांसाठी शेतकऱ्याला आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवावे. ७) सोहोळ काळवीट अभयारण्य विकसीत करून सर्व प्राण्यांना अभयारण्यात सोडावे.तसेच हे अभयारण्य पर्यटनासाठी खुले करून स्थानिकांना रोजगार व लघुव्यवसाय उपलब्ध करून द्यावे.आदी मागण्या ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी शासनाकडे केल्या आहेत.