सावली वाघाच्या हल्ल्यात वाघोली बुटी येथील दोघांचा मृत्यू झाल्याने वनप्रशासनात खळबळ माजली असून, जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे. नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वाघोली बुटी व केरोडा मोखाळा रोड या दोन्ही ठिकाणी गस्त वाढविण्यात आली असून वाघाला ट्रॅप करण्यासाठी जवळपास ५० हून अधिक कॅमेरे लावण्यात आलेले आहेत तर ताडोबा, चंद्रपूर येथील वनविभागाची अतिशीघ्र कृतीदलासह स्थानिक वनकर्मचारी अशा ६० जणांचे पथक ठकाणी तैनात करण्यात आले. परिसरात ३ पिंजरे सुद्धा ठेवण्यात आले आहे..
सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यातच वर्षभरात या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी सुद्धा गेला, त्यामुळे सध्या सावली तालुक्यातील शेतकऱ्यांतव ग्रामस्थांमध्ये वनविभागाबद्दल रोष आहे. त्यामुळे वनकर्मचारीही धास्तावल्याचे चित्र सद्या दिसत आहे. दोन दिवसांच्या वाघोली बुटी येथील घटनेने मात्र नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट अडकली होती. मात्र, वाघाचा शोध सुरूच आहे. कोणत्याही परिस्थिती वाघाला जेरबंद करा असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनकर्मचारी तैनात करून वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची चमू शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.