आरमोरी:-
दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय , वासाळा ( ठाणेगाव ) येथील श्री.बी.एस. जौंजाळकर सर हे नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक / प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. त्याप्रित्यर्थ कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयात निरोप व सपत्नीक सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवन विकास संस्था , नागभीड जिल्हा चंद्रपूरचे आधारस्तंभ तथा मार्गदर्शक राजाभाऊ देशपांडे हे होते. तर प्रमुख अतिथी रविंद्रजी जनवार साहेब सचिव , गोंडवन विकास संस्था , नागभीड , विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस.व्ही. शेंडे सर , श्री . देशमुख सर सेवानिवृत्त प्राचार्य कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय , नागभीड , सत्कारमूर्ती प्राचार्य श्री जौंजाळकर सर , सौ. जौंजाळकर मॅडम उपस्थित होत्या .
यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य श्री जौंजाळकर सर यांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव करीत असताना त्यांचा सेवा निवृत्तीचा काळ अगदी मजेत,आनंदात जावो,त्यांना व त्यांच्या परिवाराला चांगले आरोग्य लाभो यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की , मान.संस्थेचे सचिव साहेब यांचे वेळोवेळी मिळालेले मोलाचे मार्गदर्शन ,सहकार्य तसेच सर्व प्राध्यापक , शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने मी मुख्याध्यापक / प्राचार्य पदाची सेवा यशस्वीरीत्या पाडू शकलो. यशस्वी होण्यासाठी सहकाऱ्यांचे विचार ,त्यांचे सहकार्य मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. माणसाने आपल्या जीवनात सतत चांगले कर्म करावे असे त्यांनी आपल्या सत्कार्याच्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
गोंडवन विकास संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्वच विद्यालयाची उन्नती साधने हे माझे ध्येय असून मी त्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे आणि सेवानिवृत्तीचा काळ हा मुख्याध्यापक / प्राचार्य श्री जौंजाळकर यांनी एखाद्या सामाजिक कार्याशी जोडावा असे त्यांनी आपल्या प्रमुख अतिथींच्या भाषणातून व्यक्त केले.
माणसाच्या जीवनात आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी त्यांनी सदैव वाटचाल करावी , माणसाच्या जीवनाचे सार्थक करणे हे केवळ माणसाच्या हातात असून ते त्यांनी परिपूर्ण करावे तसेच चांगल्या गुणाचा विचार करून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असे निरोप तथा सत्कार समारंभाचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कारमूर्तीचा परिचय विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. शेंडे सर ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कोटरंगे सर ,तर आभार श्री. वालोदे सर यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता सर्व प्राध्यापक , शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा यांनी मोलाचे सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....