वाशिम : आगामी ऑक्टोंबर मध्ये विधानसभा निवडणूका होणार असून,त्या पार्श्वभूमिवर ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजप्रबोधनकार संजय कडोळे यांनी स्पष्टच सांगितले की, "निवडणूका ह्या मतदाराच्या विश्वासपात्र असलेल्या प्रमुख राजकिय पक्षाच्या किंवा सक्षम उमेद्वारामध्येच व्हायला हव्यात. त्यामध्ये चिल्लर हौसे-गवसे-नवसे अशा उमेद्वाराची उगीच उटपटांग गर्दी व्हायला नको." याविषयी भाष्य करतांना त्यांनी पुढे सांगीतले की,प्रजासत्ताक लोकशाहीतील विधानसभा निवडणूका ह्या मतदार राजाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता, संवैधानिक मार्गाने आणि पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात.त्यासाठी निवडणूकीमध्ये निवडणूक लढण्यास पात्र असलेल्या आणि मतदार राजाचा भक्कम पाठींबा असलेल्या सक्षम व्यक्तीनेच निवडणूकीत आपली उमेद्वारी दाखल केली पाहिजे. उगीच मतदारांना संभ्रमात पाडून आपली पोळी शेकून घेण्याकरीता कुणीही निवडणूकीत उमेद्वारी दाखल करू नये.भारतिय लोकशाहीचे मूल्य जाणून लोकशाहीचे व निवडणूकीचे पावित्र्य हे जपलेच पाहिजे.कारण "निवडणूकीचे मैदान म्हणजे एखादे लोकनाट्य किंवा डोंबाऱ्याचा खेळ नाही." याची जाणीव ठेऊन मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा आत्मविश्वास असणाऱ्या पात्र व्यक्तिनेच निवडणूकीत भाग घेतला पाहिजे. जर निवडणूक लढवितांना एखाद्या व्यक्तिला त्याच्या स्वतःच्याच कुटुंबातील,भावकीतील,मित्राची आणि महत्वाचे म्हणजे त्याच्याच दोन चार कार्यकर्त्यांची मते जर मिळू शकत नसतील.तर त्याचा निवडणूक लढवून काय उपयोग ? त्याची अनामत रक्कमही तो वाचवू शकत नसेल तर मग निवडणूका लढविण्याचा त्यांचा अट्टाहास का ? आणि कशासाठी ? मतदारांची दिशाभूल करण्यासाठी की दुसऱ्या उमेदवारांना ब्लॅकमेल करून त्याचे कडून पैसे उकळण्यासाठी.हे देखील स्पष्ट झाले पाहिजे.विधानसभेचा आमदार हा त्या मतदार संघातील लोकांचे विधानसभेत नेतृत्व करण्यासाठी असतो.व निवडून आल्यावर नेतृत्व करतांना त्याला भारतिय संविधानाची शपथ घ्यावी लागते. त्यामुळे त्याने जातपात,धर्म,भाषा न पहाता मतदार संघाची विकास कामे करायला हवी असतात. समाजाला शिक्षण, आरोग्य,रोजगार अशा सोई सवलती मिळवून द्यायच्या असतात.आणि त्यासाठी विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारा उमेद्वार हा योग्य, प्रामाणिक,मनमिळाऊ, कर्तव्यतत्पर,विश्वासू असावा लागतो.त्याचे मागे सर्वधर्मिय समाज असावा लागतो.त्याचे कतृत्व असावे लागते.त्याचा भलामोठा जनसंपर्क व त्यांची दांडगी समाजसेवा असावी लागते.शिवाय उमेद्वारी दाखल करण्यापूर्वी त्याचे मागे त्याच्या विश्वासू मतदार जनसमुदायाचा भलामोठा गोतावळा सोबत असावा लागतो.आणि ह्या सर्व गोष्टी त्याच्या सोबत असतील तरच त्याने उमेद्वारी दाखल केली पाहिजे.अन्यथा उगीच निवडणूकीला बाजार समजून चिल्लर उमेद्वाराची गर्दी करून खेळखंडोबा होऊ नये.पवित्र लोकशाहीच्या निवडणूकीचा सामना हा राष्ट्रिय किंवा प्रादेशिक प्रमुख राजकिय पक्षाच्या आणि विशेषतः मतदार संघाच्या नेतृत्वाकरीता सर्व दृष्टीने सक्षम व पात्र असलेल्या उमेद्वारामध्येच रंगायला हवा.नाहीतर चिल्लर उमेद्वारांची निवडणुकीत शंभर दोनशे मते किंवा नोटा एवढी देखील मते मिळविण्याची लायकी नसतांना निवडणूक लढविण्याचा आग्रह करून वेळप्रसंगी स्वतःचे हास्य करून घेऊ नये.कारण आजचा मतदार अडाणी राहीलेल नसून जागरूक आणि डोळस झालेला आहे.त्याला खऱ्या खोट्या उमेद्वाराची आणि निवडणूकीत विजयी होऊ शकणाऱ्या राजकिय पक्षाच्या अथवा सक्षम उमेद्वाराची चांगलीच पारख करता येते. त्यामुळे तो चिल्लर व्यक्तीला मतदान करून मत वाया घालवणार नाही.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत उगीच खेळखंडोबा व्हायला नको. म्हणून,निवडणूकीत निवडून येऊ शकणाऱ्या प्रमुख राजकिय पक्षाच्या सक्षम उमेद्वारामध्येच सामना व्हायला हवा.आणि मतदारांनी देखील जागरूक राहून,मतदार संघाचे नेतृत्व करण्यास सर्वार्थाने लायक असणाऱ्या सक्षम उमेद्वाराच्याच पारड्यात आपली अनमोल मते टाकावयास हवी.असे विचार, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार तथा समाजप्रबोधनकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहेत.