कारंजा : शालेय शिक्षण घेत असतांना ज्यावेळी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांपेक्षा उंच भरारी घेऊन शालेय अभ्यासक्रम किंवा क्रिडा स्पर्धा मध्ये प्राविण्य प्राप्त करीत असतो.त्यावेळी त्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्ट्रिने, विद्यालय, शैक्षणिक संस्था,विविध सामाजिक संस्था आणि प्रत्यक्ष शासनाकडूनही बळ देण्याकरीता त्याचा गुणगौरव म्हणून पुरस्कार दिले जातात.हे पुरस्कार त्याला भविष्यात प्रोत्साहन मिळून त्याच्या कडून जास्तीत जास्त प्रगती व्हावी यासाठी उपर्युक्त ठरत असतात.अगदी याच पद्धतीने विविध धार्मिक-आध्यात्मिक-साहित्यीक-पत्रकारिता-कला-क्रिडा-सांस्कृतिक-वैद्यकीय-कृषी-सामाजिक- राजकिय, क्षेत्रातील संस्था कडूनही दरवर्षी आपआपल्या क्षेत्रात काहीतरी आगळी वेगळी समाजोपयोगी कामगीरी करणार्या व्यक्तींना पुरस्कार दिले जात असतात.केन्द्रशासन राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही असे पुरस्कार दिले जातात.उदाहरणच घ्यायचे झाल्यास केन्द्र शासनाकडून भारतरत्न, पद्म पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार,पद्मविभूषण पुरस्कार दिल्या जातो. सैनिकांकरीता परमवीरचक्र पुरस्कार,साहित्यक्षेत्रात ज्ञानपिठ,साहित्य अकादमी पुरस्कार, चित्रपट क्षेत्रात दादासाहेब फाळके पुरस्कार,पोलिसांकरीता राष्ट्रपती पदक पुरस्कार, शिक्षकांकरिता आदर्श शिक्षक पुरस्कार,महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण, समाजभूषण आदी पुरस्कार दिल्या जातात.हे पुरस्कार देतांना त्या त्या आयोजक संस्थाचे काही नियम,अटी,शर्थी आणि निकष असतात. त्या निकषात पात्र ठरणार्या व्यक्तिंनाच हे पुरस्कार दिल्या जात असतात.पुरस्कार देण्यामागे आयोजकांचा महत्वाचा उद्देश असा असतो की, "सदरहु पुरस्कारार्थीच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेणे.आणि भविष्यात सुद्धा त्याचे हातून जास्तित जास्त समाजसेवा - देशसेवा घडावी म्हणून त्याला प्रोत्साहित करणे."समाजसेवा करणारी व्यक्ती ही मनात कोणताही किंतू परंतु न ठेवता निःस्वार्थपणे तन-मन-धनाने समाजसेवा करण्यात मग्न असते. त्यामागे आपल्या हातून जास्तितजास्त चांगली कामगीरी व्हावी एवढेच त्याला कळत असते.त्यामुळे समाजसेवा करीत असतांना ती व्यक्ती आपल्या समाजसेवेचे कोणतेही मोल मागीत नाही. किंवा त्याला तशी अपेक्षाही नसते.(उदाहरणच द्यायचे झाल्यास माझ्या सोबत घडलेली हकीकत,१) मी चौकात बसलो असतांना एक महिला रागाच्या भरात विहीरीवर आत्महत्या करावयास आली होती.व आता लगेच ती विहीरीत झेप घेणार हे क्षणार्धात जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा थोडाही विलंब न करता मी त्या महिलेचा हात पकडून तिला आत्महत्येपासून वाचवीले.असेच दुसरे उदाहरण २) माझे मंगरूळपीर येथील मित्र रमेश देशमुख यांच्या वहिनीची तातडीची शस्त्रक्रिया होती त्यांना ए पॉझिटिव्ह ब्लॅडची गरज पडली हे जेव्हा मला कळले.तेव्हा मी माझे महत्वाचे काम बाजूला सारून अकोला शासकिय रुग्नालय गाठून त्यांना रक्तदान केले.आणखी माझ्यासोबतच बालपणी घडलेली एक घटना ३) त्यावेळी मी निंभा (देशमुख) येथील माजी गृहमंत्री आ.डॉ. रणजीत पाटील यांच्या वडीलांच्या व्ही. एन. पाटील यांच्या स्वामी विवेकानंद विद्यालय वसतीगृहात शिकत असतांना काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी आम्ही पिण्याकरीता वापरात घेत असलेल्या विहीरीत डेमोक्रॉन नावाचे जहर मिसळले होते. हे माझ्या लक्षात येताच मी शिक्षकांना हकीकत सांगीतली. पुढे त्याची मुर्तिजापूर पोलिसात तक्रारही झाली व माझ्या सावधगीरीने सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थांचे प्राण वाचले.ही अशी समाजोपयोगी कामे मी कोणत्याही आर्थिक मोबदल्या करीता केलेली नव्हती हे उल्लेखनिय.) कोणताही सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता आर्थिक मोबदल्या करीता समाजसेवा करीत नसतो . कोणताही पत्रकार अपेक्षेने पत्रकारिता करीत नसतो. कोणताही क्रिडापटू, कलाकार हा जीवावर उदार होऊन कार्य करतो त्याला पैशाची अपेक्षा नसते.परंतु त्याला बळ मिळण्याकरीता प्रशंसेची गरज असते. "त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप जर कुणाकडून मिळाली तर ती त्याच्या भविष्याची पूंजी ठरत असते.आणि म्हणूनच त्याला पुरस्कार मिळणे म्हणजे त्याच्या सामाजिक कार्याचे सार्थक झाले असे त्याला वाटते."अनेक संस्था किंवा प्रत्यक्ष शासनच जेव्हा पूरस्काराचे आयोजन करतात. त्यावेळी योग्य व्यक्तींची निवड करण्याकरीता काही नियम,अटी,शर्थी व त्याशिवाय सहभाग शुल्क ठेवत असतात. व त्या त्या संस्थेच्या नियम व निकषात बसणार्या व्यक्तिंनाच हे पुरस्कार दिले जातात.अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तिंचे समाजात कौतुक व्हायला हवे.त्यांचे अभिनंदन व्हायला हवे.मात्र दुदैवाने पुरस्कारार्थीचे कौतुक करणे तर सोडा परंतु अनेक समाजविघातक व्यक्तिंच्या पोटात पुरस्कारार्थींचे समाजकार्य व त्यांना मिळालेले पुरस्कार हे खुपतात.त्याला पुरस्कार कसा काय मिळाला ? त्यांचे कोणते कार्य आहे ? त्याने पैसे देऊन पुरस्कार खरेदी केला ? वगैरे नाना प्रकारची टोमणी मारली जातात. परंतु हा समाजविघातकी व्यक्तींचा निव्वळ जळतोडेपणा असतो.स्वतः समाजकार्य करायचे नाही व इतर कुणी करीत असला तर खपवून घ्यायचे नाही.अशी काहींची विघातक प्रवृत्ती असते. त्याखेरीज पुरस्कारार्थी व्यक्तिंचा विरोध करण्याचे दुसरे काहीच कारण असू शकत नसल्याचे निर्भिड व स्पष्ट मत व्यक्त करतांना मला म्हणावेसे वाटते की,नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्ते व समाजाने त्यांचेकडे लक्ष्य देऊ नये.आपले समाजकार्य आजीवन सुरु ठेवावे. सामाजिक कार्यकर्त्यांना व इतरही प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना मिळणारे पुरस्कार म्हणजे वृद्धापकाळी समाधानाचे जीवन जगण्याकरीता भविष्याची पुंजी असते.असे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजप्रबोधनकार तथा दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.