वाशिम : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत सुधारित शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. क्रीडा गुण सवलत योजनेचा सेवाहमी कायद्यामध्ये समावेश असून ऑनलाईन पोर्टल सिस्टीम प्रक्रीयेमध्ये यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार राज्य, राष्ट्रीय व आंरतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना ऑनलाईन अर्ज करणे शक्य होते. खेळाडू गुणांपासून वंचीत राहू नये, याकरिता जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांचेच ऑफलाईन अर्ज सादर करावे.
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करुन त्याची दोन प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर कराव्यात. काही अडचन आल्यास ऑफलाईन अर्ज सादर करण्यास हरकत नाही. माहिती सुस्पष्ट अक्षरात मराठीमध्ये भरण्यात यावी. प्रती विद्यार्थी २५ रुपये तपासणी शुल्क आकारण्यात येईल. सदरचे तपासणी शुल्क कार्यालयाकडे ग्रेसगुण प्रस्ताव शिफारस करतेवेळी अमरावती विभागीय शिक्षण मंडळ यांच्या नावे चलणाव्दारे किंवा रोखीने भरावे लागेल. या अटीवर प्रस्ताव स्विकारण्यात येईल.
प्रस्ताव दोन प्रतीत सादर करतांना शाळा/महाविद्यालयाचे कव्हरींग लेटर, परिशिष्ट अ शालेय स्पर्धा, परिशिष्ठ ई, परिशिष्ट ब संघटना स्पर्धा, परिशिष्ट १०, स्पर्धेचे उच्चत्तम कामगीरीचे प्रमाणपत्र, हॉल टिकीट आदी कागदपत्रे सादर करावीत. इ. ६ वी ते १२ वी मध्ये खेळला असला तरी ग्रेस गुणासाठी इ. १० वी व १२ वी असतांना स्पर्धेत सहभागाची अट आहे. इ. १० वी असतांना खेळाडूंने सवलत घेतली असल्यास इ.१२ वी मध्ये सवलत घेण्यासाठी इ. ११ वी मध्ये आणि इ. १२ वी मध्ये खेळात सहभाग अथवा प्राविण्य मिळविणे आवश्यक असते. इ. १० वीत असतांना विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला व इ. १० वीमध्ये सवलत/लाभ घेतल्यास, जे खेळाडू थेट राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले असतील तर ते खेळाडू क्रीडागुणास इ. १२ वी मध्ये पात्र असणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2023 आहे. त्यानंतर आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाही.
क्रीडागुण सवलतीस प्राप्त असलेल्या एकविध खेळाच्या राज्य संघटनेची यादी संचालनालयाकडून तसेच एकविध जिल्हा/राज्य संघटनेमार्फत विहित कालावधीत स्पर्धेचा विस्तृत्व अहवाल प्राप्त झाल्यास शिफारस करण्यात येईल. क्रीडा सवलत गुण जलतरण, कबड्डी, बेसबॉल, कराटे, वुशू, सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बुध्दीबळ, थ्रोबॉल, योगासन, सिकई, मार्शल आर्ट, डॉजबॉल, टेनिक्वॉईट, अॅथलेटिक्स, वेटलिफ्टींग, बॉक्सींग, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, व्हॉलीबॉल, रायफल शुटींग, तायक्वांदो, कुस्ती सॉफ्टबॉल, नेटबॉल, स्क्वॅश, नेहरु कप हॉकी, रग्बी, मॉडर्न पेन्टॅंथलॉन, खो-खो, कॅरम, क्रिकेट, रोलर स्केटींग, हॉकी, किक बॉक्सींग, रोलबॉल, शुटींगबॉल, आट्या-पाट्या या खेळाकरीता सवलत गुण देण्यात येणार आहे.
अपुर्ण प्रस्ताव, अर्ज अपुर्ण किंवा खोडतोड असल्यास प्रस्ताव स्विकारल्या जाणार नाही. तसेच सादर केल्यास कुठलाही पत्र व्यवहार केला जाणार नाही. प्रमाणपत्रावर यापूर्वी सवलत घेतल्यास परत गुणांचा लाभ देण्यात येणार नाही. यानुसार शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलत गुणांचे प्रस्ताव 30 मार्च २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. विहित मुदतीनंतरचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच एकविध खेळाच्या अधिकृत संघटनानी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तर स्पर्धेचे संपूर्ण विस्तृत अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडाळे यांना सांगीतले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....