अकोला, दि. २६ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात दि. १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान
पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवा"चे आयोजन करण्याचे नियोजित आहे. या कामासाठी शासनमान्य संस्था, खासगी, सार्वजनिक लिमिटेड कंपनी, मार्केटिंग, निमसरकारी इव्हेंट कंपनी यांच्याकडून स्वारस्य अभिव्यक्ती तत्वावर प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व सांस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यायातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वदूर पोचवण्यासाठी हा महोत्सव होणार आहे.
राज्यातील विविध प्रदेशातील संस्कृतीचे आदान-प्रदान स्थानिक व विविध जिल्हा पातळीवरील कलाकारांना संधी देऊन पाच दिवस सलग कार्यक्रम रोज संध्याकाळी ६ ते १० वेळेत आयोजन करायचे आहे. त्यात सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम- महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचत्रित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार - पोवाडा, भारूड, गोंधळगीत इ., विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम, महाराष्ट्रातील विविध महोत्सव उदा. कोकणातील नमन व दशावतार, खानदेशातील वहीगायन, विदर्भातील झाडीपट्टी, खडीगंमत इ., कवितांचे कार्यक्रम, व्याख्याने, देश भक्ती गीतांचा कार्यक्रम, जिल्ह्यातील स्थानिक सण, उत्सव कार्यक्रम करणे आदींचा समावेश असेल.
महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले याबाबत प्रदर्शन, वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादक दालन, पर्यटन विषयक दालन, तसेच महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणा-या स्पर्धा, मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळांसंबंधीचे उपक्रम, जिल्हा समितीने ठरविलेले उपक्रम/कार्यक्रम सांस्कृतिक कला प्रदर्शन व उद्घाटन सोहळा, तसेच पाच दिवसाचे कलाकारांचे योग्य मानधन निवास, येण्या-जाण्याची व्यवस्था आदी खर्च या सर्वांचा समावेश असेल.
विविध कार्यक्रमासाठी पाच दिवस सलग स्टेज ४० फुट X ६० फुट तसेच ५ हजाराहून अधिक लोक बसण्याची व्यवस्था, लाईटिंग, एलईडी स्टेज, जनरेटर, साईड मास्किंग, वॉलेंटरीव्दारे व्यवस्थापन, निमंत्रण पत्रिका वाटप, कोरिओग्राफर, प्रोग्राम डायरेक्टर, महत्वाचे अतिथी मॅनेजमेंट व तसेच आवश्यक असलेले पूरक उपकरणे, प्रचार-प्रसार करण्यासाठी १० ते १५ दिवस अगोदर कार्यक्रमासाठी लागणारा इतर किरकोळ गोष्टीचा पुर्ण खर्च हँडबिल, होर्डिंग, न्युजपेपर मध्ये शासकीय दराने जाहीरात, एलईडी वाहन खर्च व इतर खर्च, सिक्युरिटी, विविध परवानग्यांसाठी लागणारा खर्चाचा समावेश असेल.
सदर प्रस्तावासाठी संस्था किंवा कंपनीकडे १० अधिक वर्षाचा अनुभव तसेच पुरेसे मनुष्यबळ असावे. देशामध्ये ३ हून अधिक राज्य शासन, निमसरकारी संस्था, महामंडळे यांच्यासोबत कार्यक्रम करण्याचा अनुभव असावा. तसेच ५ हजारपेक्षा अधिक प्रेक्षकांकरिता सामूहिक कार्यक्रमांचे व्यवस्थापनाचा व दृक-श्राव्य प्रचार-प्रसार प्रसिध्दीचा अनुभव आणि मागील ३ वर्षात प्रतिवर्ष किमान आर्थिक उलाढाल ३ कोटीपेक्षा अधिक असणा-या इच्छुक संस्थांनी आपला प्रस्ताव सात दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे व्यक्तिश: स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीकरिता सर्वसाधारण शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
००००
आपल्या प्रतिक्रिया द्या....