ब्रह्मपुरी जिल्हाच्या मागणी करिता ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने ०२ जून २०२३ रोजी ब्रह्मपुरी येथे चक्काजाम आंदोलन व भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार व भाजपा नेते अतुल भाऊ देशकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा असून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व सरकारमधील वरिष्ठ नेत्यांची लवकरात लवकर भेट घेऊन या प्रक्रियेला गतिमान करू असा विश्वास संघर्ष समितीतील पदाधिकाऱ्यांना माजी आमदार प्रा. देशकर यांनी दिला.
भौगोलिक, वैद्यकीय, शैक्षणिक व प्रशासकीय दृष्ट्या विचार केल्यास ब्रह्मपुरी हे मध्यवर्तीचे ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा, शिक्षण सेवा उपलब्ध आहेत. यासोबतच ब्रह्मपुरी हे अनादी काळापासून सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेले शहर आहे. या सर्व निकषांच्या आधारे ब्रह्मपुरी जिल्हा करण्यासाठी संघर्ष करू असे मत ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी व्यक्त केले.
ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समितीतील सुरज शेंडे, प्रशांत डांगे, राजू भागवत प्रशांत घुटके, श्री टिकले यांनी दोन तारखेला होणाऱ्या मोर्चा व चक्काजाम आंदोलनासंदर्भात माजी आमदार देशकर यांच्यासोबत चर्चा केली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असे संघर्ष समितीला कळविण्यात आले. यासोबतच या मोर्चात ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केले आहे.