वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्हयातील निवासी शाळा व वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नास्ता व जेवणाच्या तक्रारीबाबत चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. चौकशी समितीच्या तपासणीच्या अनुषंगाने कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत रात्रभर मुक्काम करुन संवाद कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भोजन, निवास, इतर सोयी-सुविधा तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीबाबत सखोल चौकशी करण्यात आली. सवड येथील वसतीगृहाचे भोजन पुरवठादार यांना काढून दुसऱ्या पुरवठादारास भोजन पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच वसतीगृहातील किरकोळ असलेल्या बाबींवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत प्रवेशित विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची कोणतीही तक्रार नसल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केली.