वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : गेल्या काही दिवसांपासून राज्य परीवहन मंडळाच्या एसटी बस या ना त्या कारणाने चर्चेत येत आहेत. कधी बसचं छप्पर गळतंय तर कधी गाडीचा क्लच खराब झालेला. आता वाशिममधून वेगळीच घटना समोर आली आहे. वाशिम बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसचे स्टीअरिंग एका मनोरुग्ण महिलेने ताब्यात घेतले. ही घटना उघडकीस आल्यानंतर काहीवेळ प्रवाशांच्या हृदयाची धडधड वाढली होती.
काय आहे प्रकरण?
वाशिम एसटी बस स्थानकावर रिसोड जाणारी (बस क्रमांक MH 06 - S 8047) बस उभी करून चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेला. याचवेळी एक मनोरुग्ण महिला बसच्या केबिनमध्ये घुसली आणि तिने स्टीअरिंगचा ताबा घेतला. त्याच बसमध्ये प्रवाशी बसत असल्याने काही वेळ हा प्रकार कुणाच्याही निदर्शनास आला नाही. मात्र, बस स्थानकावरील एका वाहकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर एसटीचे सुरक्षा रक्षक, चालक आणि वाहकाने या महिलेला स्टीअरिंग वरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. अखेर त्या महिलेच्या मुलाने आणि सुरक्षा रक्षकांनी त्या मनोरुग्ण महिलेला बसच्या खाली उतरविल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अनेक एसटी बसेसला सुरू किंवा बंद करण्यासाठी चावी नसते. त्या बस विनाचावी बटणावर सुरू होतात. सुदैवाने या बसला चावी होती. तसेच चालकाने चावी काढून बटन बंद केले होते. जर त्या बसला चावी असती तर ती बस त्या मनोरुग्ण माहिलेने सुरू केल्यानंतर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे एसटी बस गाड्यांमधील चालकांच्या कॅबिनच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर एसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.