वाशिम : कारंजा तालुक्यातील अडाण नदी पात्राचा निसर्गरम्य परिसर,विविध वनौषधीची दुर्मिळ झाडे,काळविट,हरिण, सायळ,ससे,रोही, रानडुक्कर,निलगायी इत्यादी प्राण्यांची भरपूर संख्या,कोकीळ,तितर,बटेर, विविध रंगी चिमण्या,कावळे,बगळे,पोपट इत्यादी भरपूर पक्षी असलेले अभयारण्य हे "सोहळ काळवीट अभयारण्य" किंवा "सोहळ पक्षी अभयारण्य" या नावाने विकसीत होऊ घातलेले होते.विशेष म्हणजे या अभयारण्य आणि अभयारण्य परिसरातील सोमठाणा येथील राफेरी सारख्या तिर्थक्षेत्रालगत पानवठे किंवा पाझर तलाव देखील बनविण्यात येत होते.ना. संजयभाऊ राठोड वनमंत्री असतांना त्यांनी सदर अभयारण्याच्या विकासाची जबाबदारी देखील घेतली होती.परंतु कालांतराने ना. संजयभाऊ राठोड यांचे वनमंत्री खाते इतर मंत्र्यांकडे गेले.आणि सोहळ काळवीट अभयारण्याचा पुढील विकास रखडल्या गेला.परंतु कारंजा ते मानोरा आणि कारंजा ते दारव्हा मार्गाने आपल्या वाहनातून जात असतांना प्रवाशांच्या दृष्टिला हरिण किंवा काळविटाचे कळपच्या कळप, रोही किंवा निलगायी अगदी सहजपणे दृष्टिपथात पडतात. (शिवाय अधून मधून येथे बिबट्याचेही दर्शन होत असल्याच्या चर्चा येत असतात.) आज रोजी,चंद्रपूरच्या ताडोबा सारख्या अभयारण्यात गाईड सोबत घेऊनही जेवढ्या विविध वन्य प्राण्याचे दर्शन होणार नाही. त्यापेक्षा अधिक वन्यप्राणी येथे सहजपणे दृष्टिपथात पडतात. त्यामुळे साहजिकच स्थानिक रहिवाशी ग्रामस्थांनाही वाटते की, आपले सोहळ काळविट अभयारण्य देखील पर्यटकाकरीता खुले व्हावे.तसेच हे अभयारण्य खुले झाले तर निश्चितपणे येथील निसर्गरम्य परिसर,वन्य पशु पक्षांची संख्या, भारताच्या नकाशाची जीवंत प्रतिकृती असणारे अडाण धरण पहाण्या करीता पर्यटकाची खूप मोठी वर्दळ वाढू शकते आणि त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना देखील व्यवसायातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.