शिकाऱ्यांच्या बावरिया टोळीकडून चंद्रपूर जिल्ह्यात 2 वाघांची शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात शिकार करण्यात आल्याचं उघड झालं आहे.या प्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केल्याची माहिती वनविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
गडचिरोली शहरालगतच्या आंबेशिवणी गावातून हरियाणातील बावरिया जमातीच्या 11 जणांना 23 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. या शिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यात 2 वाघांची शिकार केल्याची कबुली दिली होती आणि आता चंद्रपूर जिल्ह्यात देखील 2 वाघांची या टोळीने शिकार केल्याचं उघड झालं आहे.
आसाम मध्ये वाघाच्या तस्करीचं एक प्रकरण उघडकीस आल्यावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची स्पेशल टास्क फोर्स गठीत करून गडचिरोली जिल्ह्यातून बावरिया टोळीच्या 11 शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. गेल्या ६ महिन्यांत या टोळीने आंबेशिवणी परिसरात मुक्काम ठोकून वाघांच्या शिकारी केल्याची माहिती मिळत आहे.