दिनांक:-३० ऑगस्ट २०२३ सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे सुरु असलेल्या खोदकामादरम्यान दोन मोठे शिवलिंग आढळून आले. पार्वती माता मंदिराच्या आवारात सभागृह बांधकामादरम्यान हे शिवलिंग सापडलेले आहे.श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग आढळून आल्याने घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शिवलिंग आढळून आल्याची माहिती सर्वत्र पसरताच महिलांनी पूजापाठाला सुरूवात केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथे गावात हेमांडपंथी पार्वतीमातेचे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होतो. वर्षभरही भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. त्यामुळे या ठिकाणी सभागृहाची भाविकाची मागणी होती. आमदार निधीतून सभागृह मंजूर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कॉलमकरिता खड्ड्यांचे खोदकाम करण्यात आले, परंतु पुरात्व विभागाने या ठिकाणी खोदकाम करण्यास मनाई केल्याने खोदलेले खड्डे आज (दि. ३०) जेसीबीद्वारे बुजविण्यात येणार होते. सकाळी अकराच्या सुमारास पार्वती माता मंदिराच्या समोरील भागात सभागृह पायव्याचे खोदकामात दोन मोठ्या मुर्ती प्रमाणे मोठे दगड दिसून आले. त्यांची पाहणी केली असता शिवलिंग असल्याचे आढळून आले. शिवलिंगासभोवती माती असल्याने ते स्पष्ट दिसत नव्हती. पाण्याने साफ केल्यानंतर ते शिवलिंग असल्याचे स्पष्ट झाले.
पार्वती माता मंदिराच्या विश्वस्थांना या सापडलेल्या शिवलिंगाबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही शिवलिंगाचे निरीक्षण केले. दोन्ही शिवलिंग आकाराने मोठे आहेत. या घटनेची माहिती नेरीमध्ये होताच महिला भाविकांची पार्वती माता मंदिर परिसरात एकच गर्दी झाली. सध्या श्रावण महिना सुरू असून आणि या ठिकाणी दोन शिवलिंग आढळून आल्याने धार्मिकदृष्ट्या या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या पार्वती माता मंदिराच्या आवारात शिवलिंग आढळून आले त्या ठिकाणच्या मंदिरातील पार्वती मातेची मूर्ती देखील शेतातूनच आढळून आली होती. त्यांनतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हस्ते हेमाडपंथी असलेल्या मंदिरात मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यामुळे पार्वती माता मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान ठरले आहे. नवरात्रौत्सवात या मंदिरात महिलांची दर्शनाकरीता मोठी गर्दी होते. आता शिवलिंग आढळून आल्याने हेमाडपंथी पार्वती मातेच्या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
सध्या दोन्ही शिवलिंग खोदकामाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सुरू असलेला श्रावण महिना आणि बुधवारचा दिवस नारळी पौर्णिमेचा असल्याने महिलांनी या ठिकाणी आरती करून शिवलिंगाची पूजापाठ सुरू केली आहे.