वाशिम : दि १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अनुदान टप्पा वाढीचा शासन निर्णय निर्गमित होऊन,पात्र शाळांना एक जून २०२४ पासून अनुदान टप्पा जाहीर करण्यात आला.विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे आनंद झाला होता.मात्र ह्या निर्णयाची अमंजबजावणी होत नसल्याने हा निर्णय प्रत्यक्षात केव्हा येईल ? याची प्रतीक्षा सुरू होती.
दोन अधिवेशन संपल्यानंतर तिसरे अधिवेशन सुरू झाले तरीही प्रतीक्षा संपत नव्हती. शेवटी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शिक्षकांनी आझाद मैदान येथे दिनांक १८ जून पासून हुंकार आंदोलन सुरू केले व आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आंदोलन केले.अखेर या आंदोलनाला यश आले आहे. विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.
या प्रकरणी अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ॲड.किरणरावजी सरनाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न लावून तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाला जाब विचारला होता.त्याशिवाय पुरवणी मागण्यातील चर्चेमध्ये, विशेष उल्लेखाद्वारे अनुदान टप्पा वाढीचा सतत पाठपुरावा केला होता.मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सामूहिक निवेदन सादर केले होते.या प्रयत्नाला अखेर यश आले असून दिनांक १८ तारखेपर्यंत हक्काचा अनुदानाचा वाढीव टप्पा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
दि. ०९ जुलै रोजी आझाद मैदान येथील शिक्षकांच्या हुंकार आंदोलनात, ना.गिरीशजी महाजन यांनी उपस्थित होऊन ही आनंदाची बातमी शिक्षकांना दिली. यावेळी शिक्षक आमदार ॲड.किरणरावजी सरनाईक, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, विक्रम काळे, किशोर दराडे व हजारोच्या संख्येने विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक उपस्थित होते.
आ.ॲड.किरणरावजी सरनाईक यांनी शिक्षक समन्वय संघाच्या सर्व लढवय्या शिलेदारांचे अभिनंदन केले असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व शासनाचे आभार मानले आहेत.अशी माहिती शिक्षक समन्वय संघ वाशिम कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडे मिळाल्याचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले.