वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. अशा बऱ्याचशा योजना ज्या योजनांच्या लाभापासून सर्वसामान्य जनता अजूनही वंचित आहेत. त्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्याचे दोन प्रमुख कारण आहेत. पहिले कारण आहे बरेचसे लोकांना शासनाच्या योजनांची माहितीच नसते. दुसरे कारण लोकांना शासनाच्या योजना तर माहीत असतात परंतु त्यांचा लाभ कसा घ्यावा, हे त्यांना माहीत नसते. म्हणजेच त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा आहे, कागदपत्रे काय लागतात, लाभ घेण्याची प्रक्रीया काय असते इत्यादी गोष्टी त्यांना माहीत नसल्यामुळे काही लोक शासनाच्या बऱ्याच कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात.
शासनाने सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत व त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत. यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात “शासन आपल्या दारी” हे अभियान राबविण्यात येत आहे. आणि या अभियानाचा शुभारंभ 13 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यात दौलतनगर येथे व २५ मे रोजी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे या माध्यमातून पहिल्यांदाच प्रशासन “हर घर दस्तकच्या” माध्यमातून प्रत्येकाला योजनांची माहिती तर देणार आहे. तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रे मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाचे प्रमुख अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी प्रत्यक्ष नियोजनाचा आढावा घेत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर अशाप्रकारे आता सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोचविण्यासाठी “शासन आपल्या दारी” हे अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच अधिकाधिक योजनांचा लाभ, कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी “शासन आपल्या दारी” या अभियानाद्वारे देण्यात येणार आहे.
“शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील याची खात्री आहे. “शासन आपल्या दारी” हे एक क्रांतिकारी अभियान राज्यात सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
“शासन आपल्या दारी” या उपक्रमावर मुख्यमंत्री सचिवालयाचे पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे. "शासन आपल्या दारी"हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येईल.
या अभियानाचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा, म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची मदत सुध्दा घेणार आहोत. "महालाभार्थी"या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकणार आहोत. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन नोंदणी करून योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर, प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरणार आहे. अशा सर्व यंत्रणांना राज्य पातळीवरुन सुचना देण्यात आल्या आहेत. आज ग्राम सेवक, तलाठी, प्रांत अधिकारी स्वत: गावोगावी जाऊन नागरिकांना भेटत आहेत आणि योजनांची माहिती देत आहेत.
सातारा जिल्ह्यात या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. यापासून प्रेरणा घेत या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत.
या राज्यव्यापी अभियानात प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार, तालुक्यात १५ हजार आणि गावात किमान १०० लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे यादृष्टीने शासकीय यंत्रणांची मानसिक तयारी झाली आहे. या अभियानासाठी १६ हजार योजना दूत नेमण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुखी समाधानाचे दिवस यावेत, शासनाविषयी जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, ही दोन्ही चाके विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. महिला सन्मान योजनेतील एसटीच्या 50 टक्के सवलतीमुळे महिलांचा प्रवास वाढला आहे. एसटीने दिलेल्या सवलतीमुळे ज्येष्ठांच्या प्रवासात वाढ झाली आहे. यानिमित्ताने प्राप्त झालेला महसूल ही जमेची बाजू म्हणता येईल.
"शासन आपल्या दारी"ही योजना, महाराष्ट्राच्या जडणघडणीतला हा पहिला कार्यक्रम आहे, ज्यात अधिकारी व कर्मचारी गावोगावी, घरोघरी जाऊन योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजना असो की श्रावण बाळ योजना, कोणत्याही योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही या अभियानाच्या माध्यमातून दिली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....