वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या दोन दिवसात सर्व तालुक्यांमध्ये युरिया खताची उपलब्धता होणार आहे. युरिया खताच्या एका बॅगची किंमत २६६ रुपये आहे. यापेक्षा जास्त दराने शेतकऱ्यांनी युरिया खरेदी करू नये. तसेच जादा दराने विक्री होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ संबंधित विक्री केंद्राची तक्रार करावी. तक्रार करण्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे ही तक्रार करावी.
बॅगेतील युरियाला पर्याय म्हणून लिक्विड स्वरूपातील नॅनो युरिया सर्वच विक्री केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एका युरियाच्या ४५ किलोच्या गोणीमधून जेवढे नत्र पिकाला मिळते,तेवढेच नत्र नॅनो युरियाच्या एका ५०० मिली बॉटलमधून पिकाला मिळते.दोघांची कार्यक्षमता एकसारखी आहे.नॅनो युरिया ४ मिली प्रति एक लिटर पाण्यामध्ये टाकून सर्वच पिकासाठी फवारणीची शिफारस करण्यात आली आहे.नॅनो युरिया लिक्विड स्वरूपातील असल्यामुळे पिकाची नत्राची गरज अधिक प्रभावीपणे भागविते. नॅनो युरीया पर्यावरणपूरक असल्यामुळे जमीन,पाणी व हवा यांची हानी होत नाही.त्यामुळे बॅगेतील युरिया ऐवजी लिक्विड स्वरूपातील नॅनो युरियाचा वापर करावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे.