वाशिम - व्यसनामुळे कुटुंबाची राखरांगोळी होते. त्यामुळे अशा व्यक्तींना व्यसनापासुन परावृत्त केले पाहीजे या विचाराने प्रेरीत होवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमाच्या माध्यमातून दोन व्यक्तींना दारुच्या व्यसनापासून परावृत्त करण्यात आले. व्यसनापासुन दुर झालेल्या या व्यक्तींचा शुक्रवार, १५ मार्च रोजी स्थानिक वानखेडेनगर येथे विदिशा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मौजे कोयाळी येथील दिगंबर इंगोले व सदानंद वानखेडे या पार व्यसनात डुबलेल्या व दिवस रात्र दारू शिवाय कोणतीही गोष्ट सुचत नसणार्या या दोन व्यक्तींनी वेळी सावध होऊन भविष्यात पुन्हा कधीही दारू व कोणत्याही नशेली पदार्थापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली. सत्कार कार्यक्रमाला समनक जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अनिल राठोड यांच्या हस्ते पुष्पहार प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पी. एस. खंदारे यांनी महामानव भगवान गौतम बुद्ध व संत समाज सुधारकाचे विविध दाखले देत मानव जीवनावर व्यसन कसे परिणाम करते या संदर्भात मार्गदर्शन केले आणि या दोन व्यक्तींनी व्यसनमुक्त राहण्याचा जो संकल्प केला आहे. तो स्तुत्य असून व्यसनावर होणारा अनाठायी खर्च वाचून आपण आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणावर खर्च करावा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आणि माझ्या उधारासाठी साधी सुपारीचे देखील व्यसन लावून घेतले नाही त्या महामानवाच्या विचाराचा प्रचार व प्रसार करावा आणि आपण जसे व्यसनमुक्त झाला तसेच इतरांना देखील व्यसनमुक्त करण्यात या पुढाकार घ्यावा कारण व्यसनी माणसाकडे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कधीच चांगल्या नजरेने पाहत नाही व त्याला कुटुंबातच नाही तर समाजात देखील मानसन्मान मिळत नाही. आपण जो निर्णय घेतला तो अतिशय स्तुत्य असल्याने आपण पूर्वीप्रमाणेच निर्व्यसनी बनून संत समाज सुधारकांच्या विचाराने चालावे असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा पर शब्दात व्यक्त केले. यावेळी समनक जनता पार्टीचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष अजय सोनुलकर, महाराष्ट्र अंनिसचे शाहीर दत्तराव वानखेडे, शाहीर सदाशिव राऊत परिवर्तन कला महासंघाचे शेषराव मेश्राम, सूर्यभान घोडे, मोहन शिरसाट, रवीनंद इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विदेशा महिला मंडळाचे यशोधरा वानखेडे, वैशाली वानखेडे, मथुराबाई वानखेडे, भारतीबाई बनसोड, अनुसया पुंडगे, दीक्षाभूमी घोंगडे, निकिता बनसोड, सागरबाई इंगोले आदींनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत वानखेडे, विद्यानंद वानखेडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस.खंदारे यांनी तर आभार शेषराव मेश्राम यांनी मानले.