आयुष्य जगत असतांना विद्यार्थी म्हणून जगाव कारण विद्यार्थी कधीच अपयशी होत नाही. तिजोरीतील धन एक ना एक दिवस संपेल पण ज्ञानरूपी धन कधीच संपत नाही आणि ज्ञानरूपी धन कुणी चोरूही शकत नाही. म्हणून माणसाने ज्ञानरूपी धनाने श्रीमंत असावे असे मौलिक विचार राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.ते नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील नेवजाबाई हितकारीणी विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्यात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ने.हि. शिक्षणसंस्थेचे सचिव अशोक भैय्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री शोभाताई फडणवीस, विधानपरिषद शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुर्व विदर्भाध्यक्ष प्रा. महेश पानसे, सरपंच शर्मिला रामटेके यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, आयुष्यात स्वतःला विद्यार्थी समजून जगाल तर आयुष्याचा खराखूरा आनंद मिळविता येईल. शाळेत पहिल्या आणि शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेत विशेष ओळख असते.
शाळेत आयुष्य घडविण्यासाठी आपण शिकत असतो पण शाळेतून बाहेर पडल्यावर जीवन जगण्यासाठीची खरी धडपड सुरू होते. लहानपणीच आयुष्य अत्याधुनिक आनंद देणारं असत. त्यामुळे पुन्हा लहान व्हावस वाटत अस सांगत यावेळी आमदार विजय वडेट्टीवारांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
हा माजी विद्यार्थी मेळावा एकाच शाळेत शिकलेल्या पण आता विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे मन जोडण्याचं काम करतोय त्यामुळे यानिमित्ताने त्यांनी आयोजकांचे कौतुक देखील केले.
रक्ताच्या नात्यापेक्षा वर्गमित्र श्रेष्ठ असतात कारण ही घट्ट विणलेली नाती आहेत. त्यामुळे संकटकाळात ते धावून येत असतात. त्यामुळे ही नाती जपा.
विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक आणि ज्या विद्या मंदिरात आपण शिक्षण घेतले. त्यांचे उपकार जर फेडायचे असेल तर समाजासाठी आदर्श कार्य करण्याची प्रेरणा आपण बाळगावी असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विद्यालयातुन सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....