कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रम अंतर्गत,केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे "माझी माती माझा देश"अर्थात "मेरी मिट्टी मेरा देश" (मिट्टी को नमन वीरो को वंदन) ही महत्वाकांक्षी मोहीम अभियान दि.०९ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सप्ताहांतर्गंत करण्यात आले आहे. तर दि. १३ ते १५ ऑगष्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहीती कारंजा न.प. मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त असे की, "माझी माती माझा देश"हे अभियान दि. ९ ते १४ ऑगष्ट पर्यंत राबविण्यात येणार आहे तर दि.१३ ते १५ आँगष्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली न. प. सर्व विभागप्रमुखांची बैठक संपन्न झाली. सदर “माझी माती माझा देश" अभियान अंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहर पर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे त्यानुसार १२ ऑगष्ट शनिवार रोजी सकाळी ०८.०० वाजता झाशी राणी चौक कारंजा येथे शिलाफलक उभारणी, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक विरांना वंदन, पंच प्रण ( शपथ ) घेणे, ध्वजारोहण व शालेय विद्यार्थ्यांची रॅली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच “हर घर तिरंगा " उपक्रम अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन कारंजा न.प.मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी केले असल्याचे त्यांनी कार्यालयीन प्रसिद्धी पत्रकाद्वारे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेला कळविले असल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी वृत्त दिले आहे.