वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ):काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून "न्यू पिंक व्हॉट्सॲप" लिंक सायबर भामट्यांकडून व्हायरल केली जात आहे. लिंकला ओपन केल्यानंतर गुलाबी रंगाचे व्हॉट्सॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते.हे पिंक व्हॉट्सॲप डाउनलोड केल्यास त्यामुळे मोबाईल हॅक होऊन त्यातील गोपनीय माहिती सायबर भामट्यांच्या हाती लागून त्या आधारे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या घोटाळ्यात व्हॉट्सॲपवर यूजर्सना एक लिंक पाठवली जाते.या लिंकवरून यूजर्सना व्हॉट्सॲप पिंक व्हर्जन डाउनलोड करण्यास सांगितले जाते.हे ॲप वापरकर्त्यांच्या फोनमधील वैयक्तिक डेटा चोरते. ते ॲप इन्स्टॉल करणाऱ्या यूजर्सचे त्यांच्या मोबाइलवरील नियंत्रण सुटू शकते किंवा त्यांचा मोबाइल हॅक होऊ शकतो आणि फसवणूक करणाऱ्यांना तुमचा कॅमेरा, स्टोरेज, कॉन्टॅक्टमध्येही प्रवेश मिळू शकतो. शिवाय तुमचे बँक अकाऊन्ट सुद्धा साफ होऊ शकते .त्यामुळे मोबाईल धारक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे .