म्हणतात उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी... त्याचप्रमाणे असेही म्हणता येईल की.....स्वच्छता आणि शिस्तीने नैतिकता त्यास बळकटी देई.स्वच्छता,कामातील आणि सामाजिक शिस्त ही मानसाच्या आयुष्याला आनंदी जीवनाचा उपहार प्रदान करीत असते. ती नैतिक जीवनाच्या मार्गाने वैयक्तिक, सामाजिक तथा भौतिक आणि मानसिक प्रगतीला यशाच्या शिखराकडे घेऊन जाणारी एक जादुई विद्या आहे.ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगणारी, त्याचे जतन शिकविणारी आणि लोकशाही संकेतांना अबाधित ठेवणारी आहे.समृध्द,उदात्त जीवनातून दिव्या आनंदाची अनुभूती देणारी आहे.ती कठीण नव्हे तर सहज साध्य होणारी एक साधी गोष्ट आहे.फक्त या स्वच्छता,शिस्त आणि नैतिकतेचे महत्व प्रत्येक नागरीकाने समजून घेऊन त्याची सुरूवात प्रथम स्वत:पासून करावी. त्याचप्रमाणे तिचे महत्व आणि उपयोगीता ईतरांना समजून देण्याचे सेवाकार्यही केले पाहिजे.तेच एक निरोगी समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी झटणाऱ्यामनुष्याचे कर्तव्य आहे. शिस्तबध्द,कर्तव्यतत्पर तथा परिपक्व विचारी आणि आचरणाच्या जबाबदार नागरीकाची ओळख देणारे महत्वपूर्ण कार्य आहे.
स्वच्छता आणि शिस्त तथा नैतिकतेचा विषय हा फक्त आपल्या घरापुरता मर्यादित नाही. ते आचरण कार्यालयात, सामाजिक कार्यात किंवा जिथे कुठे आपण दिवसभर अनेक दिवस कामानिमित्त प्रवासात फिरत असू त्या सर्व ठीकाणी ते पाळले जावे,असे ते आपल्या समजुतदारीचे उदात्त पथ्य आहे.त्या मार्गाने आपलाही समाजात,कार्यालयात,प्रवासात व इतरत्र आदर वाढतो.त्यापासून इतरांनाही आपण तसं करावं ह्या प्रेरणा निर्माण होऊन सामाजिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने टाकलेले ते एक पाऊल ठरते.जबाबदार माणसातील नागरीकत्वाची ओळख देणारा तो त्या माणसातील एक महत्वपूर्ण गुणधर्म असतो.
नुसता उच्च शिक्षणाने,पैशाने आणि चांगले कपडे घातल्याने माणूस कधी मोठा ठरत नाही.तर त्याला आपले जीवन सुलभ आणि उदात्त करण्यासाठी समाजातील इतरांच्याही सोई,गैरसोयीचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. मानवी जीवनमुल्ल्यांचे शिस्तबध्द जीवन कसे जगावे यावर माणूस म्हणविल्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाने विचार करणे ही समाजासोबतच त्यांची स्वतःचीही गरज ठरते.ही संधी मनुष्याला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील उच्चतम ध्येयाकडे नेणारी,आणि उन्नत जीवनाची प्राप्ती करून देणारी कामधेनू म्हणून सिध्द होऊ शकते.
या विषयावर चिंतन नेहमीच असते,परंतू सध्या विषय आठवण्याचे कारण म्हणजे माझे गोवा परतीतील प्रवासात एका मनाला खटकणाऱ्या विपरीत वागण्याकडे गेलेले लक्ष....!प्रवासात ए.सी कोचमध्ये गोव्यातून मी बसलो. त्यांच्या अगोदरच्या स्टेशनपासून किंवा मडगावपासून दोन उच्चशिक्षित तरूण बसलेले होते.ते दोघेही २४ आणि ३० वर्षाचे इंजिनिअर किंवा अधिक उच्चशिक्षित असावेत.माझं त्यांच्यासोबत थोडं हिन्दी, इंग्लिश बोलणं झालं.त्यातून समजलं त्यातील एक फिलीपिन्समध्ये नोकरी, उद्योग करतो,तर एक अमिताभ बच्चन टाईप उंचीचा केरळमध्ये असतो.त्यांचा मडगांव ते पनवेल आणि नंतर मुंबई असा प्रवास होता.
ए.सी.कोचमध्ये बहूधा सुशिक्षित,शिस्तीचे सहप्रवासी असतात.त्यामुळे आपल्या नेहमीच्या सवयीनुसार ते आपल्या खाद्यपदार्थाची पाकीटे,कागद प्लेट असा स्वतःचा सारा कचरा स्वच्छतागृहाजवळील कचरापेटीत वेळोवेळी नेऊन टाकत असतात.ती अंगी बाणवलेली नेहमीची शिस्तीची सवय असते.त्याबाबत कटाक्षाने संवेदनशीलतेची गांभिर्यता असते.परंतू या उच्चशिक्षितांचे वागणे मात्र विपरीत वाटले. समोरासमोरील सिटांच्या बाजुला पाण्याच्या बास्केट टाईप तारेचे बॉक्स हॅंगर हे फक्त पाण्याच्या बॉटल ठेवण्यासाठीच असतात.परंतू या सुशिक्षित म्हणविणारांनी तो बॉक्स रात्रभरात कागद आणि सिगारेटच्या पाकीटांनी भरून ठेवलेला होता.ते सकाळी पनवेलला उतरल्यानंतर खिडकीजवळ सरळदिशेची सिट म्हणून तेथे बसलो. तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि याचवेळी सुशिक्षित कुणाला म्हणावे हा नेहमी चिंतनात असणारा विषय माझ्या डोक्यात आला.रेल्वे प्रवासात अनेक तरूण बुट, चप्पलसह पाय दुसऱ्या पायावर टाकून, तो समोरच्या सिटवरील गृहस्थांना त्यांच्या कपड्यांना वारंवार लागेल अशा पध्दतीने हालवत असतात.अशावेळी ते कधी मोकळेच तर कधी मोबाईल किंवा लॅपटॉपवर असतात.परंतू त्यांचे पवित्र पाय सतत कीतीही वेळा समोरच्याला लागत गेले तरी त्याची त्यांना पर्वा नसते. आपला थोडा तरी चांगूलपणा जागृत करून समोरच्या व्यक्तीची होणारी अडचण समजून घेण्याचे संस्कार आणि सुसंस्कृता त्यांच्यात आढळत नाही.कारण शिक्षण हे फक्त आयुष्यात भरपूर पैसा कमवून स्वत:ची आणि स्वतःच्या कूटूबांला ऐश्वर्यसंपन्न मजा उपभोगता यावी यासाठी त्यांनी ते घेतलेले असते.तेथे समाज,नागरीकत्व,लोकशाही,शिस्त आणि जीवनमुल्ये यांचा फारसा परिचय करून घेण्याच्या भानगडीत ते कधी पडलेले नसतात.
त्यांच्याकडून काही बेशीस्तीच्या गोष्टी घडत असतात.अशा या नासमज लोकांसाठी समजूतदारपणा घेऊन काही वेळा विशिष्ठ मर्यादेपर्यंत सहन करण्याची सोशीकताही माणसाला जीवनात शिकावी लागते.परंतू महात्मा गांधी मात्र एकच होऊन गेले.त्यामुळे त्यांच्या आदर्शांचे गुणगान आम्ही कितीही करीत असू, तरी त्यांच्याएवढ्या महाकाय सोशिकतेचा महापुरूष आत्तापर्यंत तरी अजूनही निर्माण झालेला नाही. त्यात आम्ही पत्रकार म्हणजे अनुचित बाबींवर चुप न बसण्याची सवयीचे सेवक.परंतू तरीही वाद नको म्हणून न बोलण्याच्या काही मर्यादा पाळत असतो. त्या पलिकडे गेल्यावर मात्र मला महात्मा गांधींना क्षणभर तरी विसरावे लागते.ईतरांनाही काही त्रास असेल तर ते बिचारे चूप बसणारे असतात. त्यामुळे सौम्य जाणीव देणाऱ्या छोट्याशा वादाचा ड्रामा केल्याशिवाय अशावेळी गत्यंतर नसते.नाही तर "आ बैल मुझे मार" सारखं होईल.
सर्व कचरा कोंबून भरून ठेवणारे पनवेलला उतरून गेले.परंतू मला त्या हॅंगर बॉक्समध्ये माझी बॉटल ठेवायची होती.त्यामुळे त्यांनी केलेला सर्व कचरा मला गाडगे बाबा आणि महात्मा गांधींच्या संकेतांचे स्मरण करून त्यातून काढून कचरा पेटीत नेऊन टाकावा लागला.हे मान्य आहे की सार्वजनिक साफसफाई आम्ही कधी कधी जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि इतरांसोबत ठरवून करीत असतो.मग त्या मोबदल्यात आमचे फोटोही तेवढे निघत असतात.परंतू या कामात माझी पाण्याची बॉटल ठेवणे हा तर स्वार्थ होताच.नाही म्हणायला अकोल्यातील मोर्णा स्वच्छताही आम्ही स्वयंस्फूर्तीने आणि कर्तृत्वाच्या भावनांनी केलेली आहे.परंतू फक्त फोटो काढून घेणाऱ्या गर्दीच्या संस्कृतित बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या कामाचे मुल्यमापण करणारे आजच्या काळात तरी दुर्मिळ आहेत. जेव्हा मी १९८५ च्या दरम्यांन स्वामी जोमानंद यांचे अध्यात्मिक साहित्त्य आणि मानवी जीवनमुल्ल्यांवरील सुविचारांची पुस्तके काही जणांना देत होतो.तेव्हा जीवनातले वास्तव अनूभव घेणारा आमचा एक मित्र आम्हाला म्हणायचा "अरे तू लोहाराच्या बाजारात सोन्याच्या सुया वाटत आहेस" ते त्याचं सत्त्यच होतं.परंतू त्यावर विचार करत काम करत राहण्याची सवय आम्हाला सोडता आली नाही.
चांगले विधायक विचार, शिस्त,संविधान कायदे, प्रामाणिकपणे काम व त्यातील नियोजन आणि पारदर्शकता याबाबतचे उपदेश म्हणजे बहूसंख्य लोकांना ही कडवी प्रवचने वाटतात. लोकशाहीतील हक्कांसाठी जेवढी तत्परतेने मतलबांची जागृती असते तसे कर्तव्यावर कोणाला सांगणे रूचत नाही.मग असे उपदेश करणाऱ्या लोकांना टाळणारे किंवा तो आळसवाणा विषय म्हणून तिकडची दिशा टाळून रस्ते बदलणारांची संख्या समाजात भरपूर प्रमाणात आहे.त्यामुळेच मानवी जीवनमुल्ल्यांचा धोकादायक प्रमाणात ऱ्हास होत आहे.
या मनमानी बेशीस्त वागण्यामुळे निरोगी आणि शांततामय समाजव्यवस्थेसाठी पुरक ठरणारी बंधुत्वाची नाती अनेकवेळा अडचणीत येतात.स्नेहबंधांनांना तडे जाऊन समाजात एकोप्याऐवजी दुरावे निर्माण होऊन सुडबुद्धी,व्देषभावना आगीच्या वणव्याप्रमाणे वाढत राहतात.त्यामुळे,कुटूंब,कामकाजाची ठीकाणे,शेजारी पाजारी,मित्र,आप्तस्वकीयांमध्ये वाद उद्भवून सामाजिक शांतता धोक्यात येणारे वातावरण तयार होते.कोणताही वाद होतांना स्वतःच्या चुकांची वास्तवता न स्विकारता दुसऱ्याला दोष देणाऱ्या स्वार्थी वृत्तीचा शिरकाव झाल्याने माघार घेण्याची वृत्ती लोप पावत आहे.त्यातून मग्रूरी आणि अहंकाराच्या भावनांच्या लाटा या वादांची व्यापकता अधिक वाढविण्यास कारणीभूत ठरत असतात.
शिस्तीच्या या विषयामध्ये रस्त्यावरील वाहतुक आणि त्याची नियमावली पालन न करणारांचे प्रमाण लक्षणिय वाढत असल्याने वाद तर ठरलेले असतातच.मग ते वाहतुक पोलिसांसोबत असोत की रस्त्यांवरील वाहनधारकांसोबत....!परंतू त्यापेक्षा या बेशीस्तीने अपघाताची संकटेही ओढवली जातात. याचीही पर्वा वाहनं चालविणारांकडून केली जात नाही.म्हणतात ना "या जन्मावर शतदा प्रेम करावे" परंतू या अनमोल जीवनाचे महत्व समजून घेता फक्त अट्टाहास आणि बेशीस्ती ही व्यसनांप्रमाणे मनुष्यावर एवढी आरूढ का झालेली आहे याचे उत्तर मात्र मिळत नाही.त्यात मोबाईलच्या व्यसनाने माणसाला एवढं वेडं केलेलं आहे,की उदरभरणाच्या कामात..... खाणे पिणे यासाठी मात्र ठराविक वेळा असतात. परंतू मोबाईलला मात्र नव प्रियकर प्रेयसीप्रमाणे सतत डोळ्यासमोर ठेऊन जवळ बाळगण्याची व्हि आय पी ट्रीटमेण्ट असते.ते मोबाईल मग गाडीवर चालतांना बोलण्यासाठी वापरले जातात.पायी चालणारे पादचारी सुध्दा समोर येणाऱ्या दगड धोंड्याची ठेच लागण्याची किंवा समोरून येणारे वाहन किंवा आपल्यासारख्याच दुसऱ्या चालत येणारा ची सुध्दा पर्वा न करता चालतांना आढळतात.ते एखाद्या शास्त्रज्ञांच्या तल्लीतेने आपल्याच धुंदीत चालत राहतात.त्यामुळे वाहतुकीच्या नियमाप्रमाणे वाहनांपासून सावधान किंवा अन्यत्र सुचनांच्या बोर्डांप्रमाणेच त्यात आणखी काही सुचनांची भर टाकण्याची वेळ आज आलेली आहे.ती म्हणजे आता अशाही सुचनांची बोर्ड असावित की " सावधान लक्ष ठेवा...समोरून मोबाईल वेडे येत आहेत".
वाहनधारकांमध्ये अनेक विचित्र नमुनेही दिवसभरात बघायला मिळतात.भर रस्त्यावर अर्ध्या रस्त्यांवर गाड्या उभ्या करणारे किंवा पार्कींगला शिस्तीत लावलेल्या गाड्यांच्या मागे आपल्या गाड्या आडव्या उभ्या करणारे मतमंद ही भयंकर डोकेदुखी आहे.आपल्याअगोदर गाडी काढायला येणारा त्याची गाडी कशी काढेल या सोई गैरसाईचे विचार करण्याची या अविचारी लोकांना विचार करण्याची काही गरजच कधी वाटत नाही.रस्त्यावरील गर्दीच्या रहदारीमध्ये भरधाव वेगात गाडी चालवून समोच्याला पुढे जाऊन कट मारणारांना कोणाचीही पर्वा नसते. अनेकवेळा विरूध्द साईडला जोरात आल्याने योग्य साईडला जाणारावरच त्याला वाचवण्याची वेळ येते. तो बिचारा वाहनधारक स्वत:चा बचाव करून त्यालाही धक्का लागू नये याची काळजी घेतो.तरीही त्याच्याकडेच रागाने पाहणाऱ्या अनेक विचित्र हस्ती दररोज आढळतात.त्याप्रमाणे चौकातील क्रॉसिंग वर घडत असते.परंतू बेफाम वेगाने,विरूध्द साईडने आणि चौकातून कोणाचीही पर्वा न करता जाणारे हे संस्कारहिन, उरफाटे, मग्रूर लैला व त्यांचे मजनू महाशय रहदारीची,नियमांची आणि मानवतावादी मुल्ल्यांची कोणतीही काळजी घेण्याचे सोयरसुतक ठेवत नाहीत.शिस्तीत योग्य दिशेने जाणारे मात्र या जीवावर उदार झालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.परंतू हे भांडखोर अति बुध्दीमान त्यांच्याकडेच जसं त्याचं शर्यतीतीलं घोडं मारल्यागत तावातावाने पाहत असतात.....स्वत:चं मुर्खत्व सिध्द करीत असतात. अशा या निरोगी आणि शांततावादी समाजाला लागलेल्या या उपद्रवी वाळवीचं काय करावं? हाच आज एक न सुटणारा प्रश्न होऊन बसला आहे.अशा उपद्रव मुल्य घेऊन जीवन जगणाऱ्या कुरापतखोरांना सव्वाशेर भेटल्याशिवाय त्यांच्या अहंकार आणि मग्रूरीच्या नांग्या कधी ठेचल्याच जात नाहीत.अशा चुकीच्या मार्गाने जीवन जगून ईतरांनाही सतत क्लेषाचा महाप्रसाद वाटणारांचे समाजातील प्रमाण वाढत चालल्याने चांगल्या लोकांना बाबारे...!"तुझ्या चांगुलपणाचे उपकार नकोत ....भिक नको पण राजा कुत्रा तरी आवर...., तुझ्यामुळे आमच्यावर संकट नको एवढी साधी बुध्दी तरी बाळग...! असं म्हणण्यावाचून पर्यायच नसतो....!
आपल्या प्रतिक्रिया द्या....