आई आपल्या मुलावर पराकोटीचे प्रेम करते म्हणूनच तिची मुलाप्रतीची प्रत्येक कृती त्याच्या हिताची असते. प्रसंगी तिचं कठोर शब्दातील रागावण सुद्धा त्या प्रेमापोटी आलेलं असत. ज्या समाजात आपण काम करीत आहोत, त्या समाजावर प्रचारकाचं असं मातेसमान प्रेम असणं ही पहिली कसोटी होय. ज्याच्यासाठी काम करत आहोत त्याच्या बद्दलची वत्सलता ही पहिली पायरी प्राप्त केली की वाटचाल सोपी होते.
प्रचारकाच्या हातात गावातील जनता असावी. प्रचारकाचे म्हणणे जनतेने ऐकले पाहिजे असा प्रचारक असावा. तो आपलं गाव तिर्थ व्हाव या ध्येयाकडे त्याची वाटचाल असावी. जनतेला तो कारागीर वाटला पाहिजे. त्याच्यात गाव आदर्श बनविण्याची कला असावी. तो प्रचारक जादुगर आहे की काय असे जनतेला वाटायला हवे.
ऐसा प्रचारक जादुगर ।
त्याच्या मुठीत जनसागर ।
नव्या सृष्टीचा कारागीर ।
वाटे जना ।।
राष्ट्रसंत ग्रामगीतेतून म्हणतात , आपले गाव आदर्श करण्यासाठी, आपले गाव उत्तम कार्याने आदर्श होण्यासाठी चांगला प्रचारक हवा. उदाः- जसे मोहोळावरील राणी माशी जिथे जाऊन बसेल त्याठिकाणी पाठोपाठ सर्व मधमाशा तिथे जाऊन बसतात व पाहाता पाहाता मोहोळ तयार करतात. तसेच उत्तम प्रचारकाचे कार्य होईल.
मित्र हो ! आदर्श कराया ग्राम ।
उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम ।
तरी चाले उत्तम काम ।
गावाचे आपुल्या ।।
गावात प्रचारकाचे उत्तम कार्य होण्याकरिता प्रचारकाचे काय लक्षण असावे? त्याचे आचरण कसे असावे? त्याची राहणी, स्वभाव, बोलणे कसे असावे? ध्येय धोरण गावासाठी कोणते असावे? प्रचारकाचे अंगी कोणते गुण असावेत? म्हणजे लोकांची सुधारणा करु शकेल. गावाच्या भाग्योदयासाठी सामर्थ्यवान प्रचारक असावा. प्रचारक शिलवान असावा. त्यात सत्य, चारित्र्य, लीनता इत्यादी गुण असावेत. प्रचारक चित्त शुद्धीने गावाची सुधारणा घडवून आणतो. प्रचारकास सत्तेचा मोह नसतो आणि पैशाचा मोह त्यास नसतो. त्याचा स्वभाव सात्विक असतो. प्रचारकाचे पाण्याहूनही पवित्र असे त्याचे अहिंसक अंतःकरण असते.
श्रोतियांनी विचारला प्रश्न ।
प्रचार करील गावी पूर्ण ।
तया प्रचारकाचे लक्षण ।
कैसे असे ।।
प्रचारकाची दिनचर्या कशी म्हणाल तर थोडाही वेळ तो रिकामा घालवित नाही. सेवा कार्याला साजेल ते ते सर्व करीतच राहतो. प्रचारकाच्या डोळ्यात सात्विक तेज व त्याच्या शब्दाशब्दात प्रभाव भरलेला असतो. वैराग्य, त्याग त्याचे सहज वागण्यातून दिसतात. फळ पिकल्यावर ते आपोआपच देठापासून वेगळे व्हावे तसे सर्व इंद्रिये विषयाच्या आसक्तीतून मोकळे होतात.अर्थात ही प्रचारकाची निरासक्त अवस्था असते. प्रचारक अंतर्मूख होऊन सेवारत असतो. ऊन, पाऊस, थंडीचा प्रचारकाला त्रास वाटत नाही. तो कधी उदास होत नाही. सदोदित त्याचा चेहरा आनंदित दिसतो.
प्रचारकाची दिनचर्या ।
वेळ जराहि न घालवी वाया ।
जे जे शोभे सेवेच्या कार्या ।
ते ते करी सर्वही ।।
कोणत्याही विरोधकाने प्रचारकावर शिव्यांचा भडिमार केला, तरी तो हसत हसत सहन करतो व आपले विचार पुन्हा प्रेमळपणे समजाविण्याचा प्रयत्न करतो. सहनशिलता प्रचारकाचा स्थायीभाव असतो. कोणाशी कितीही वादविवाद झाला तरी त्याचे तोंडून एकही वाईट शब्द निघणार नाही, उलट तो गांभिर्याने राहील. प्रचारक दुसऱ्याचे आघात सहन करतो व आपले शुद्ध विचार चालता, बोलता सहज लोकांना पटवून सांगतो. प्रचारक गोड बोलून लोकांची मने आकर्षित करतो व त्यांत गावाच्या सुधारणेस कामी लावतो. गावात कुणाचे कुटुंबात भांडणे झाली तर तेथे एकता निर्माण करतो. कुठे दुफळी झाली असेल तर तेथे तडजोड घडवून आणतो.
कोणी विरोधक शिव्या देई ।
हसूनि त्याचे शब्द साही ।
गोड बोलूनि समजावित जाई ।
आपले म्हणणे ।
गावात सौख्य, समाधान नांदू लागेल, यासाठी असे थोर प्रचारक गावी निवडावे व सेवातत्पर असणारी सेवा मंडळे निर्माण करावीत. असे सुख संपन्न गाव ज्यांनी कर्तबगारीने केले तेच कीर्ती रुपाने जगात अजरामर झालेत, हे जाणून आता प्रचार कार्याला सुरुवात केली पाहिजे. राष्ट्रसंत म्हणतात की, मी वारंवार सांगत आलोय. प्रचारक निर्माण व्हावे म्हणून प्रयत्नास लागलो व प्रचारकाचे सेवा कार्याच्या माध्यमातून सर्वांचा दास बनलो. राष्ट्रसंत म्हणतात. ग्राम निर्मितीचा मूळ पाया प्रचारकच आहे वा ग्रामगीता ग्रंथही त्या कार्यासाठीच लिहिला आहे.
ऐसे प्रचारक निवडा गावी ।
मग गाव नांदेल वैभवी ।
सेवा मंडळे स्थापूनि द्यावी ।
सेवे साठी ।।
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....