वाशिम : केव्हा केव्हा तर वाटते की,राज्याचा हवामान विभाग म्हणजे 'बोलायची कढी आणि वाढायाचा भात' असे या हवामान विभागाचे विचित्र अंदाज असल्याने विश्वास ठेवावा की अविश्वास दाखवावा. अशा प्रकारे शेतकऱ्यांची त्रेधा मन:स्थिती होत असते. तरी पण 'लांडगा आला रे आला . . . ' अशी हाळी देवून सहकाऱ्याची फसवणूक करणाऱ्या गुराख्यावर ऐन संकटकाळी वाईट वेळ आली. अविश्वास दाखवल्याने अखेर त्या बिचाऱ्या गुराख्याच्या अख्या शेळ्या लांडग्याने फस्त केल्या. काहीशी तशी अवस्था होऊ नये म्हणून शेवटी आपण हवामान विभागाच्या इशाऱ्याची दखल घेत असतो. या संदर्भात अधिक वृत्त असे की,सध्या विदर्भामध्ये सुर्यनारायण देवता आग ओकीत असल्याने उष्णतेचे व उकाड्याचे प्रमाण चांगलेच वाढलेले आहे. मात्र अशाचवेळी दुसरीकडे रात्री पश्चिम बंगालच्या उपसागरा पासून तर अरबी समुद्रापर्यंत अचानक कमिदाबाचा पट्टा निर्माण होऊन हवापालट होवून वातावरणीय बदल झाला असून विदर्भाच्या काही भागांत पुढील चार तासातच वादळी वाऱ्यांचा आणि विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये विशेषतः नागपूर,भंडारा, गडचिरोली,गोंदिया,चंद्रपूर,वर्धा,यवतमाळ अकोला,वाशिम, भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडू शकतो. तर दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून,धुळवादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल.असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांनी हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष्य न करता खबरदारी घ्यावी. त्यामुळे आपल्या शेत मशागतीची कामे दिवसाचे पूर्वार्धात दुपारपूर्वी उरकून घ्यावी.दुपारनंतर आकाशात वातावरण बदलून पावसाचा अंदाज येताच शेतातून गावाकडे आपल्या घरी परतावे.विजा कडाडत असतांना शेतात किंवा हिरव्या आश्रयाला जाऊ नये. किंवा आपल्या शेळ्यामेंढ्या झाडाखाली बसवू नये.आपले टिव्ही,रेडीओ,मोबाईल,बंद ठेवावे.अचानक अति पावसामुळे पूरस्थिती उद्भवल्यास पूराचे पाण्यातून,पांदण रस्ते,नदी नाल्यातून मार्ग काढू नये. सद्यस्थितीत काही भागात पाऊस झाला तरीही कृषी विभागाच्या सल्ल्याशिवाय पेरण्या करू नयेत.