सावरगाव : नागभीड तालुक्यातील नांदेड- कच्चेपार या आडवळणावरील मार्गावर रस्त्याचे व पुलांचे बांधकाम सुरू असताना पावसाळा लागल्याने रस्त्याचे काम बंद करण्यात आले. केवळ पुलाचे काम सुरू आहेत. यामुळे या मार्गावर जवळपास तीन कि.मी. अंतरापर्यंत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नांदेड-कचेपार हा मुख्य डांबरी मार्ग आहे. याच मार्गाने नागरिक दररोज ये- जा करतात. मात्र रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी या रस्त्याचे व पुलांचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वीच या रस्त्याचे काम काही प्रमाणत तरी पूर्ण व्हायला पाहिजे होते. मात्र संथगतीने काम होत असल्याने ते अपूर्णच आहे.
पावसामुळे चिखल झाले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्पुरती तरी उपाययोजना करावी, अशी मागणी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक खोब्रागडे नांदेड, कच्चेपार येथील नागरिकांनी केली आहे.