सर्वकाळ लाटांसारखे विचार तरंग उठणाऱ्या मनोरूपी समुद्रावर कर्तव्यनिष्ठेचा पूल बांधायला भगवद्गीता आपल्याला शिकवते. हा पूल आपल्याला प्रत्येकालाच बांधावा लागतो. तो बांधताना गीताचिंतनात मी हा खारीचा वाटा उचलतोय.
खारुताई बद्दल असं म्हणतात,की ती बऱ्याच वृक्षांची फळे, बिया जंगलात नेऊन माती उकरून वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवते आणि नंतर स्वतःच विसरून जाते! तिच्या नकळत झालेल्या या कृतीने जंगलात नंतर आपोआप झाडे उगवतात. त्यांचेच मोठाले वृक्ष होतात.त्याचा लाभ पुढच्या असंख्य पिढ्यामधील जीवांना होतो.तसाच हा प्रयोग मी करत आहे. खारुताईचा वाटा उचलतो आहे. न जाणो, कोणाला भविष्यात याचा कसा उपयोग होईल.. कदाचित नेमकं हेच वाचण्यासाठी कोणीतरी शोधत असेल आणि अत्यंत गरजू माणसाला वाळवंटात पाणी मिळावे,तसे माझे ओंजळभर गीता ज्ञान त्याची तहान भागवू शकेल. नवे जीवन देऊ शकेल. त्यावेळी असेन मी, नसेन मी.. पण गीतेची ऊर्जा मात्र प्रत्येक क्षणाला तशीच असणार!
किती तेजस्वी मनोवृत्तीला गीता निर्माण करू शकते, आजच्या श्लोकात थोडंसं डोकावून पाहा म्हणजे पटेल.
आजचे श्लोक:-
मत्त: परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनंजय।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रेमणिगणा इव।।७।।
रसोsहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः।
प्रणवःसर्ववेदेषु शब्दःखे पौरुषं नृषु।।७।।
भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विश्वाची सर्वदूर पसरलेली अनंत अनंत व्यापक शक्ती, जी कणाकणाचे नियंत्रण नियमन, निर्मिती आणि नाश हे अखंडपणे करत आहे.ती पूर्ण दिव्यता म्हणजे अर्थात कृष्ण.अर्जुनाला तो सांगत आहे,की "हे अर्जुना, माझ्यापासून या जगात अगदी थोडे सुद्धा वेगळे काहीही नाही.मी सर्व काही व्यापलेले आहे.जसे मण्यांच्या माळेमध्ये सर्वांसोबत दोरा ओवलेला असतोच, तसंच पाण्यातला रस,ओलावा मीच आहे.अर्जुना, सूर्य चंद्राचे तेज मीच आहे.सर्व वेदांमधला ओंकार मी आहे.आकाशामध्ये शब्द मी आहे आणि पुरुषांमधली पुरुष शक्ती मीच आहे. (सर्व प्राणीमात्रांमधल्या स्त्री-पुरुषांमधली निर्मिती करणारी यंत्रणा असा व्यापक अर्थही घेता येईल.)
अर्थ लावताना सहज समजते, की कृष्ण केवळ अर्जुनाच्या समोर रथात असलेली व्यक्ती नाही तर ती सार्वकालिक दिव्य शक्ती आहे. तोच सर्वव्यापी परमेश्वर आहे.तो सारं काही व्यापून उरला आहे.
हे आपल्याला कळणार कसं? सोपं उदाहरण देतो.जे सारं काही दिसतं, त्याच्यामागे न दिसणारे अदृश्य काहीतरी असते, हे आपल्याला जाणवते ना? हे न दिसणारे अदृश्य तत्व कुठपर्यंत पसरले आहे ?तर विश्वाला अंत नाही.अत्यंत दूर दूर दूर म्हणजे सगळीकडे विश्वाचा पसारा पसरलेला आहे.विचार करा, हे जग कुठेही संपणार नाही.या जगाला काहीही मर्यादा नाही.जिथे आपण मर्यादा घालतो,त्याच्या पलीकडे अमर्याद जग आहे.जसे एखादी छोटे वर्तुळ काढावे, त्यापेक्षा त्याच्या बाहेरून त्याला व्यापून टाकणारे आणखी मोठे वर्तुळ काढता येईल.त्या मोठ्या वर्तुळाला व्यापणारे त्यापेक्षा आणखी मोठे वर्तुळ काढता येईल.अशा प्रत्येक वर्तुळाला व्यापणारे त्यापेक्षा मोठे वर्तुळ काढता येईल.असा परमात्मा सर्वदूर पसरला आहे.वर्तुळाला केंद्र असते.तसे विश्वभर पसरलेल्या कुठल्यातरी युनिक अशा विश्वाचे एक केंद्र आपल्या प्रत्येकामध्ये असते.आपण प्रत्येकजण परमेश्वरी लीलेचे केंद्र आहोत.
हे कसे समजावे? म्हणून एकेक गोष्ट नीट समजण्यासाठी भगवान कृष्ण येथे उदाहरण देतात,की माळेत ओवलेला दोरा, तसा मी या जगात प्रत्येक ठिकाणी आहे.ओलावा हाच पाण्याचा आत्मा आहे.तो या विराट परमेश्वरातून पाण्याला प्राप्त झाला.तसेच सूर्य,चंद्र नित्य तेजस्वी राहतात.सूर्यावर सतत हायड्रोजन निर्माण होतो आणि जळत राहतो.कोण निर्माण करतो? विलक्षण आश्चर्य आहे! ते निर्माण करणाराच अदृश्य परमेश्वर आहे.शब्द निर्माण होतो.पण शब्दाला सुद्धा आकाशाचा आधार आहे.या आकाशामध्ये सारं काही अधांतरी आहे. आपलं जीवन सुद्धा अधांतरी आहे.अनिश्चित आहे.शब्द सुद्धा आकाशाच्या आधाराने निर्माण होतो आणि हे जग निर्माण होण्यासाठी सर्व प्राणिमात्रांमध्ये जे पौरुष लागते, ते निर्माण करणारे सामर्थ्य सुद्धा परमेश्वराचं रूप आहे.असा सर्वत्र सारखा व्यापणारा तुमच्या आमच्या हृदयात सुद्धा तोच आहे. हृदय सतत स्पंदन करत राहते.आपण झोपल्यानंतरही त्याचं सतत स्पंदन चालत राहते.हृदय हा असा अत्यंत रहस्यमयी अवयव शरीरात नित्य राहतो.ज्याच्यात रक्त सतत शुद्ध होत राहतं.आपल्या शरीराच्या आत शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे.म्हणजे ती परमदिव्यता नक्कीच आपल्या हृदयामध्ये काम करते.हे आपण ओळखायला हवं,की माझ्या आत मध्ये काहीतरी महान शक्ती सतत रक्ताची शुद्धी करते.तसंच माझं सारं शरीर मन आणि जीवन सुद्धा शुद्ध करते.एवढेच काय माझं नशीब सुद्धा मला शुद्ध करून पाहिजे.माझं भाग्य मला उजळायला पाहिजे,तर मला विश्वास कोणाचा? त्याच एका परम दिव्यतेचा! त्याच्या मागे लागायला हवं.आणि सारं जीवन सुंदर करून दे, म्हणून हक्काने सांगायला हवं.तो देतोच! कारण गीतेमध्ये त्यांने तसं प्रॉमिस केलं आहे आपल्याला.माणसासारख्या पोकळ बाता परमेश्वराला मारता येत नाहीत.दिलेली वचने पाळावीच लागतात.म्हणून त्याच्यावर भार ठेवावा आणि आपल्याला समजतं, तसं आपल्या शक्तीप्रमाणे प्रामाणिक कर्तव्य करत बिनधास्त जगावं!
जय श्रीकृष्ण!
लेखक:-श्रीनिवास राघवेंद्र जोशी
कारंजा लाड,जिल्हा:-वाशीम
आपल्या प्रतिक्रिया द्या....