कारंजा [लाड] : हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती शिवरायांच्या शिवकालिन काळापासून, व अगदी त्यापूर्वीच्या पौराणिक अशा पुरातन काळापासून महाराष्ट्रामध्ये आदिशक्ती अंबाबाईला प्रसन्न करून घेण्याकरीता, मातृशक्ति उपासकामध्ये, गोंधळ्याद्वारे, नवरात्रोत्सव व नवदुर्गोत्सवामध्ये गोंधळ जागरण घालण्याची, जोगवा मागण्याची आणि संबळ - चोंडक्याच्या गजरात अंबाबाईच्या आरत्या म्हणण्याची परंपरा असून, आद्यशक्ती अंबाबाईला प्रसन्न करून घेण्याकरीता भक्त आणि अंबाबाई यांना जोडणारा दुवा म्हणून गोंधळ्यांना गुरुस्थानी मानले जाते व त्यांना धनधान्य, कपडालत्ता, दानदक्षिणा देऊन अंबाबाईला साकडं घातल्या जातं व नवस फेडला जात असतो. नवरात्रात गोंधळी घरी यायला पाहीजे म्हणून देवीभक्त गोंधळ्यांना सुपारी देवून आवतन (आमंत्रण) देत असतात. शिवाय शुभ विवाह म्हणजेच लग्नप्रसंगी नवविवाहांताना कुलस्वामिनीचे शुभाशीर्वाद मिळून त्यांचा संसार सुरळीत व्हावा म्हणून महाराष्ट्रात लग्नात नवरी नवरदेवाला हळद लावण्यापूर्वी जातीवंत गोंधळ्यांकडून गोंधळ जागरण घातले जात असून, "तेल जळो विघ्न टळो." ह्या उक्तीने दिवटी पाजळल्या जात असते. गोंधळ घालण्याची ही प्रथा महाराष्ट्रियन मराठा, पाटील, कुणबी, देशमुख, ब्राम्हण, वाणी, तेली, कुंभार, धनगर, लोहार यासह सर्वच हिंदू समाजात आजही कायम आहे. आपल्या विदर्भासह, झाडीपट्टी, मराठवाडा, खान्देश,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह , तसेच अगदी ग्रामिण भागासह राजधानी मुंबईतही मातृशक्ति उपासकांनी गोंधळ जागरणाची परंपरा आजच्या विज्ञानयुगातही, काळाच्या ओघात लुप्त न होऊ देता पूर्ण दिमतीने जपल्याचे दिसून येते .

या संदर्भात अधिक माहिती देतांना, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांनी सांगीतले की, "गोंधळ जागरणाबद्दल स्कंध पुराण, देवी पुराण, एकनाथी भागवत, शिव छत्रपती शिवरायांचे चरित्र, गड आला पण सिंह गेला इत्यादी साहित्याद्वारे आणि लोक साहित्य व लोकगीतामध्ये जागर गोंधळाचे महत्व विषद केले आहे . गोंधळ जागरणाची सुरुवात कशी झाली ? याबद्दल माहुरगडची रेणुकादेवी, यल्लमादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी यांच्या कथाद्वारे असे सांगीतले जाते की, माता रेणुकादेवी पुत्र भगवान परशुरामाने साधुसंत - ऋषी मुनींना छळणार्या बेटासूर नामक असूरराजाचा बेटासूराचा (दानवाचा) आपल्या परशू या शस्त्राने वध करून, मृत्युवेळी शरण आलेल्या बेटासूराला मोक्ष देण्याकरीता त्याच्या हाडामासातंतूपासून संबळ चोंडकं निर्माण करून, आई अंबाबाईचे स्तुतिगान करण्याकरीता पहिला गोंधळ जागर घातला त्यामुळेच गोंधळी समाज भगवान परशुरामाला आद्य गोंधळी मानतो. शिवाय शिवकालिन बखरी व मराठ्यांच्या इतिहासातून असे दिसून येते की, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी गोंधळी समाजाने, तळहातावर प्राण घेऊन मावळ्यांच्या खांद्यांला खांदा लावून हेरगिरी केली. करपल्लवी-नेत्रपल्लवी-मशालपल्लवी ह्या गोंधळी समाजाच्या सांकेतिक भाषा होत्या व हिंदवी स्वराज्याकरीता शिवरायांच्या काळात गड किल्ले स्वराज्यात घेण्या करीता त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचे इतिहासात नमूद आहे. तानाजी मालुसरे, शेलारमामा, सुर्याजी मालुसरे या गोंधळ्यांनी, कोंढाण्याच्या मोहीमेवर निघाले असतांना, कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात रायाजी घेरेसरनाईक या कोळी सरदाराकडे गोंधळ जागरण घालून कोंढाणा किल्ल्याची खडानखडा माहिती मिळवून, आणि तानाजी मालुसरे यांनी किल्लेदार उदेभानूशी लढतांना स्वतःचे बलिदान देऊन कोंढाणा सर केला आणि प्रत्यक्ष शिवरायांनी या किल्ल्याचे नामकरण सिंहगड म्हणून केल्याचा इतिहास आहे.

अशा या गोंधळ्यांच्या गोंधळ आख्यानाशिवाय मातृशक्ती उपासक किंवा देवी भक्तांची उपासनाच पूर्ण होत नाही . त्यामुळे नवरात्रोत्सव आणि लगीन सराईत गोंधळ जागरणाला जणू उधाण येत असते. गोंधळ जागरणामध्ये एक नायक व दोन सहकारी आणि संबळ-चोंडके-टाळ ही वाद्य असतात. गोंधळ्यांच्या गळ्यात कवळ्यांच्या माळा, हातात वारू, जोगवा मागण्याची परडी आणि कोटंबा असतो. गोंधळ जागरणात नऊ धान्याचा नवशक्तिचा घट मांडून, पानाचा विडा व अन्नपूर्णेचा कलश (घट) स्थापन करून त्यावर पातळ चोळी हिरव्या बांगडयाची ओटी ठेवली जाते. त्यावर ज्वारी किंवा बाजरीच्या पाच धांड्याची खोपडी ठेवून साडी, पातळ किंवा भगव्या उपरण्याने झाकली जाते.बाजूला दिवटी दिपमाळ पेटवली जावून त्यावर भक्तमंडळी तेल जाळतात. आणि गोंधळी आपल्या गोंधळ आख्यानामधून जगदंबेच्या गुणगाण स्तुती सोबतच श्रद्धा जरूर ठेवा परंतु अंधश्रध्दा बाळगू नका. धर्मजागृती, व्यसनमुक्ती , हुंड्या सारख्या वाईट कुप्रथा इत्यादी बाबत राष्ट्रीय समाजप्रबोधनाची जनजागृती करीत असतात .जसजसी भक्तमंडळी दिवटीवर पळी पळी तेल जाळत जातात तसतसी भक्त मंडळीची विघ्न संकटे भस्म होवून, घरादार वास्तूची शांती होऊन, गृहक्लेश, गृहपिडा, मंगळदोष, साडेसाती, रोगराई दूर होऊन , भक्तांच्या कमाईमध्ये बरकत येऊन त्यांचे घरी महाशक्ती-महालक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा सदैव वास रहातो. तसेच देवीभक्ताला एका महायज्ञाचे पुण्य लाभत असल्याची आख्यायिका आहे. नवरात्रात, अमावस्या, पोर्णिमेला भक्ताची संकटे निवारण लेऊन भक्ताला पुण्य लाभावे म्हणून गोंधळी घरोघरी-दारोदारी जाऊन जोगवा मागत असतात आणि देवी उपासक त्यांना जोगव्यामध्ये अन्न धान्याचे दान, वस्त्रदान, सुर्वणदान करीत असतात . ग्रामिण भागात तर कुणबी शेतकरी शेतात पिकलेले धान्य गोंधळ्याना जोगवा दान करण्याकरिता वेगळे काढून ठेवत असतात. ही वस्तूस्थिती आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....