या जगातला संपूर्ण स्वातंत्र्याने वागू शकणारा प्राणी म्हणजे माणूस.पण केवळ स्वातंत्र्याचा वापर प्रत्येकच माणूस आपापल्या मर्जीने करू लागला तर सगळी अनागोंदी होईल.ते होऊ नये म्हणून काही नियम प्रत्येकाला पाळावेच लागतात.वेळोवेळी बदलणारे परंतु समाजाचे हित आणि आरोग्य जपणारे नियम सर्वांनी मान्य करायलाच हवेत.सामाजिक आरोग्य सांभाळून स्वतःचे पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत माणसाला विकास करण्याची निसर्गाची पूर्ण परवानगी असते.मग हे नियम पाळताना माणसाला शिस्त लागून घ्यावी लागते.ही शिस्त म्हणजे रेल्वेच्या रुळासारखी असते.एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जाताना अथवा पहिल्या स्टेशन पासून शेवटच्या स्टेशन पर्यंत पोहोचताना दोन्ही रुळांमधलं अंतर जराही कमी होत नसतं. तेवढे अचूक अंतर ठेवूनच ते दोन रूळ पुढे पुढे जात राहतात.म्हणूनच त्यावरून जाणारी रेल्वे सुसाट वेगाने जाऊ शकते!कारण रुळातल्या अंतराची शिस्त शेवटपर्यंत पाळली आहे.
अशीच शिस्त जीवनामध्ये आवश्यक असते, हे गीता शिकवते.म्हणून भगवान या दोन श्लोकांमध्ये आपल्याला काय सांगतात, ते समजून घेतलं पाहिजे.ते म्हणतात,की 'आसक्ती विरहित असं बलवानांचं बळ मी आहे. धर्माच्या विरुद्ध नसलेला म्हणजे धर्माला अनुकूल राहील असा समाज निर्मितीला आरोग्यदायक राहील,अशा संस्कारातून आलेला जगाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला काम परमेश्वराचे स्वरूप आहे.सात्विक राजस आणि तामसिक हे सर्व भाव परमेश्वरात राहतात पण परमेश्वर त्यांच्यामध्ये असत नाही.'
थोडक्यात,या साऱ्या गोष्टी आणि त्रिगुणातून बनणारी सृष्टी, सारं काही परमेश्वरात फिरत असते-जसे आकाशात ढग फिरतात.पण आकाश त्या ढगात नसते! ढगांना व्यापून उरून ते पुन्हा बाहेर अनंत पसरलेले असते.ढगांचा रंग अथवा गुण आकाशाला लागत नसतो. ढगांमधल्या पाण्याचा स्पर्शही आकाशाला होत नाही.आकाश अलिप्त आहे.तसे त्रिगुणात्मक सृष्टीतून परमात्मा पूर्णतः अलिप्त असतो.