लाकूडफाटा आणण्यासाठी गेलेल्या बहिणभावापैंकी भावाचा खून झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे घडली आहे. गुलाम मोहम्मद असं खून झालेल्या पंधरा वर्षीय मुलाचे नाव असून तो इयत्ता नववीत शिक्षण घेत होता.
सदर घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम आणि त्याची बहीण स्वयंपाकासाठी जाळण्यासाठी लाकूड गोळा करायला गेले होते. पुढे शेतात गेल्यानंतर भावाला काहीजण मारहाण करू लागल्याचं बहिणीने पाहिलं आणि ती घरच्यांना सांगण्यासाठी घरी धावत आली. पण ती ज्यावेळी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात भावाकडे गेली त्यावेळी त्याचा मृतदेह झाडाला लटकत होता. काही दिवसांपूर्वी पिडीत आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली होती. पिडीतेच्या गायीने आरोपीच्या शेतातील काही धान्य खाल्ले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील लहान मुलांचे भांडणे झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी हस्तक्षेप करत ही बाब पोलिसांपर्यंत जाऊ दिली नव्हती. त्याचाच राग मनात धरून ही हत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.
दरम्यान, दोन्ही कुटुंबातील अंतर्गत वादामुळे ही हत्या झाली असून या घटनेचा तपास आम्ही करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.