अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य ऑटो चालक अरविंद पाटोळे यांनी ब्रँड अँबेसिडर विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात 26 एप्रिल २०२४ रोजी दिव्यांग व जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ऑटोची निशुल्क सेवा दिली . गेल्या महिन्याभरापासून मतदार साक्षरता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी विविध पद्धतीने मतदान सुलभ करण्यासाठी कार्य करीत होते . यादरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो चालक अरविंद पाटोळे व त्यांच्या सहकार्यांनी संकल्प करून 26 एप्रिल २०२४ रोजी दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत निशुल्क सेवा देण्याचे अभिवचन डॉ.कोरडे यांना दिले होते . राष्ट्रीय कार्य म्हणून ऑटो चालक अरविंद पाटोळे यांनी अकोट फैल , रेल्वे स्टेशन व तार फैल परिसरात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या स्वयंसेवकांतर्फे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेले त्यांचे मतदान झाल्यावर पुन्हा त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविले . डॉ.कोरडे यांनी फोनवरून दिलेल्या सूचनांचे पालन करून कमी वेळात अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत अरविंद पाटोळे यांनी पोहोचविले . दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया ऑटोचालक पाटोळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व डॉ.विशाल कोरडे यापुढेही जे कार्य सोपवतील ते आनंदाने करून समाजसेवा करण्याची भावना सुद्धा श्री पाटोळे यांनी व्यक्त केली .