वरोरा :- शहरात अनेक प्रभागांमध्ये नगर परिषदेद्वारा सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र या शौचालयाच्या स्वच्छतेकडे डागडुजीकडे व्यवस्थेकडे नगर परिषदेचे, ठेकेदाराचे संपूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे.
वरोरा शहरातील न. प.द्वारा आझाद वार्ड येथे शौचालय बांधण्यात आले, या सार्वजनिक शौचालयाचा वापर अनेक गरीब महिला, पुरुष करीत असतात. नगरपरिषदने या शौचालयात पाण्याची तसेच विद्युत पुरवठ्याची सोय केली होती. परंतु या शौचालयाची आजची स्थिती बघता, 2 ते 3 वर्षापासून नगरपरिषद स्वच्छता, पाणी, विद्युत पुरवठ्याची गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे. या प्रभागातील शबनम सलीम शेख, उज्वला भरत नागपुरे, दीपावली गणेश पडोले, सुमनबाई मानकर, सुरेखा लक्ष्मण नागपुरे सार्वजनिक शौचालयाच्या जवळ राहतात. यावर्षीच्या पावसामुळे शौचालयातील घाणीने तीव्र रूप धारण केले असून या घाणीतून मोठमोठ्या अळ्या रोडवर चालताना दिसतात. दुर्गंधीमुळे या शौचालयाच्या जवळ असणाऱ्या कुटुंबामध्ये, मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील कुटुंबीयांना त्यांच्याच घरात राहणे आता कठीण झालेले आहे. शौचालयाच्या दुर्गंधीमुळे अनेक लहान मुले आजारी पडत आहे. यासंदर्भात वार्डातील अनेक महिलांनी या सार्वजनिक शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत नगरपरिषद अधिकाऱ्यांना माहिती दिली परंतु अधिकाऱ्याने खातुरमातुर उत्तरे देऊन वेळ काढू पणाच केला. यामुळे वार्ड वासियांनी पोलीस निरीक्षक वरोरा, सुधीर भाऊ मुनगंटीवार पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनातून कारवाईची मागणी केली आहे.
चौकट
आमच्या वार्डातील नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालय किमान 4 वर्षापासून स्वच्छ झालेच नसून याकडे नगर परिषदेचा कोणताही अधिकारी कर्मचारी भटकलाच नाही. नगर परिषदेचे अधिकारी सामान्य गरीब नागरिकांना जनावरे तर समजत नाही ना? या संदर्भात अनेकदा तक्रारी दिल्या मात्र उद्या हे कार्य पूर्ण करूच अशा थापा हे अधिकारी कर्मचारी देत असतात.
सुमनबाई मानकर
- नागरिक
चौकट:-
आजाद वार्ड येथील शौचालयाच्या संदर्भात नगरपरिषद,आरोग्य कर्मचारी भूषण सालवटकर यांना विचारणा केली असता, उन्हाळ्याच्या दिवसात तिथे असलेले बोअरचे पाणी आटून जाते, त्यामुळे शौचालयात घाण पसरते उद्या टँकरद्वारे या शौचालयाची पूर्ण स्वच्छता केली जाईल. तसेच याबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी मला प्राप्त न झाल्याचे त्यांनी सांगितले.