मंगळवारी दि २५ रोजी सर्वदूर चांगले वातावरण असतांना, सर्वत्र नागरीक आप आपल्या दैनंदिन व्यवहारात मग्न असतांनाच दुपारी ३:०० वाजेपासून, निसर्गराजाने अक्षरशः कहर करीत,कुठे चक्रवात,कुठे सुसाट वारा,कुठे गारपिट तर कुठे मुसळधार पाऊस उशिरा रात्री पर्यंत धो धो कोसळत होता. व पंजाब डख यांच्या अंदाजपूर्ण भविष्यवाणी प्रमाणे आणखी दि ३० एप्रिल पर्यंत व पुढे मे महिन्या मध्ये सुध्या असेच अंदाज येत असल्याने,आता नागरिकांचा सयंम सुटत असून,ऐन उन्हाळ्यात निसर्गाच्या प्रकोपामुळे पावसाळा सदृश्य परिस्थिती उद्भवली असल्याचेच दिसून येत आहे. याविषयी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष संजय कडोळे यांच्या वृत्तानुसार मंगळवारी २५ एप्रिल कारंजा व मानोरा पंचक्रोशितील सर्वच ग्रामिण भागामध्ये, चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटून पडल्या. घराची छपरे उडून गेली व लिंबा सारख्या आकाराच्या गारांसोबतच धो धो पाऊस कोसळला.शेतकऱ्याच्या फळ झाडांचे व पालेभाज्याचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे वृत्त मिळाले आहे.
शिवाय कारंजा शहरात बाजार पेठेतील मालाचे सुद्धा काही प्रमाणात नुकसान झाले असून,पावसामुळे सांडपाण्याच्या नाल्या तुडूंब भरून वाहील्या असून सर्व केरकचरा रस्त्यावर येऊन रस्त्या रस्त्यावर नदीनाल्याप्रमाणे पाणी वाहत असल्याने नगर पालिका नगर पंचायतीचे वाभाडे निघाल्याचे दिसून येत आहे.प्रचंड पावसामुळे विद्युत गुल झाली असून विजेच्या लपंडावाने अंधाराचे संकट कोसळल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणच्या वार्ताहराच्या वृत्तानुसार रामनगर, पिंप्री फॉरेस्ट जनुना, गिर्डा, इंझोरी, दापुरा, मानोरा इत्यादी ठिकाणी दगडाप्रमाणे लिंबा सारखी गार कोसळत होती. दापुरा इंझोरी येथील झाडे, विजेचे खांब रस्त्यावर पडल्यामुळे कारंजा मानोरा मार्ग बंद पडल्याचे दिसून आले. असे वृत्त देण्यात येत आहे. शिवाय आणखी चार पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याने बळीराजा सोबतच ग्रामीण व शहरी नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे.