वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज 30 ऑगस्ट रोजी आत्मा कार्यालय येथे शेतकरी दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते डॉ.विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.चातरमल,स्मार्टचे नोडल अधिकारी श्री.वाळके, प्रभारी कृषी उपसंचालक श्री.धनुडे, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या प्रदेश सरचिटणीस रूपाली देशमुख, जिल्हाध्यक्ष जगदीश देशमुख व उपाध्यक्ष अंजली पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी शेतकऱ्यांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देऊन चिया उत्पादन व विक्री व्यवस्थेसाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा कंपनीसोबत करार करण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांशी चिया उत्पादन व विक्रीविषयी प्राथमिक चर्चा केली व उपस्थित शेतकऱ्यांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी चिया विपणनबाबत, खरीप पीक परिस्थितीबाबत कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.भरत गीते यांनी तर कृषी सहायक श्री. शिरसाठ यांनी चीया सिडबाबत मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी श्री. बोरकर यांनी चिया उत्पादनाबाबत अनुभव कथन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून चिया उत्पादन व विक्री हा विषय शेतकऱ्यांसाठी आजच्या जयंती कार्यक्रमात चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी चर्चात्मक सहभाग घेऊन उत्सुकता दाखवली. प्रास्ताविक प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार कृषी सहाय्यक नितीन उलेमाले यांनी मानले